RR vs LSG फलंदाजांच्या कामगिरीची राजस्थानला चिंता; लखनऊविरुद्ध आज जयपूरला होणाऱ्या लढतीला कर्णधार सॅमसन मुकण्याची शक्यता

आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी रंगणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानला प्रामुख्याने फलंदाजांच्या कामगिरीची चिंता असेल.
RR vs LSG फलंदाजांच्या कामगिरीची राजस्थानला चिंता; लखनऊविरुद्ध आज जयपूरला होणाऱ्या लढतीला कर्णधार सॅमसन मुकण्याची शक्यता
Published on

जयपूर : आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी रंगणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानला प्रामुख्याने फलंदाजांच्या कामगिरीची चिंता असेल. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन पोटदुखीमुळे या लढतीला मुकण्याची शक्यता आहे.

२००८मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मिळवणारा राजस्थानचा संघ तूर्तास ७ सामन्यांतील फक्त २ विजयांच्या ४ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. पहिल्या दोन लढती गमावल्यावर राजस्थानने दोन सामने जिंकले. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी सलग तीन लढती गमावल्या. त्यातच गेल्या लढतीत जयपूरलाच राजस्थानला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिल्लीविरुद्ध ते सुपर-ओव्हरमध्ये हरले. त्यामुळे आता ते घरच्या प्रेक्षकांसमोर कामगिरी उंचावण्यास आतुर असतील.

जयपूरमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात दव येत असल्याने येथे धावांचा पाठलाग करणे सोपे जाऊ शकते. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वाल व नितीश राणा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र रियान पराग, शिम्रॉन हेटमायर व ध्रुव जुरेल यांनी निराशा केलेली आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर प्रभावी ठरत आहे. त्याला संदीप शर्मा व तुषार देशपांडेची साथ लाभणे गरजेचे आहे. फिरकीपटू महीष थिक्षणा अपयशी ठरत आहे. क्षेत्ररक्षणातही राजस्थानला सुधारणा करावी लागणार आहे.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळताना लखनऊने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत लखनऊने चेन्नईकडून पराभव पत्करला. आता जयपूरमध्ये ते पुन्हा विजयपथावर परतण्यास आतुर असतील. पंतला काहीशी लय गवसली असली तरी फलंदाजीत मुख्य भिस्त ही निकोलस पूरन व मिचेल मार्शवरच आहे. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर व फिरकीपटू दिग्वेश राठीकडे लक्ष असेल. १५० किमी वेगाने गोलंदाजी करू शकणारा मयांक यादव या लढतीत परतण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधवीर चरक, फझलहक फारुकी.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in