
हैदराबाद : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीची लढत गमावलेल्या लखनऊ सुपर जायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान आज असणार आहे. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार असून येथील खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना मदत करते. येथे झालेल्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात हैदराबादने तब्बल २८६ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सनेही २४२ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील तीनपैकी दोन सर्वोच्च धावाही याच मैदानावर झाल्या आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा चाहत्यांना चौकार-षटकारांचा पाऊस बघायला मिळू शकतो. हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान लखनऊसमोर असणार आहे.
गत उपविजेता हैदराबादचा संघ हंगामातील पहिल्याच लढतीत आयपीएलमधील विक्रमी धावसंख्या करण्याच्या उंबरठ्यावर होता. या सामन्यात त्यांनी राजस्थानला ४४ धावांनी धूळ चारली. या मोठ्या विजयानंतर चांगल्या नेट रनरेटमुळे हैदराबादच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. अष्टपैलू खेळाडूंनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असून पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहण्यासाठी प्रयत्नशील असेल.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात इशान किशनने वादळी शतक झळकावत हैदराबादला २८६/६ धावांचा डोंगर उभारून दिला. हैदराबादच्या फलंदाजांची फटकेबाजी ही प्रतिस्पर्धी खेळाडूंसाठी धोक्याची घंटा आहे. किशनसह अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, हेनरिच क्लासेन ही तगडी फलंदाजी सनरायजर्सच्या ताफ्यात आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक सामन्यात लखनऊला एका विकेटने पराभूत केले. मधल्या काही षटकांत त्यांचे फलंदाज भरकटले. तेच संघाला महागात पडले. दिल्ली विरुद्धच्या लढतीत लखनऊने अखेरच्या ८ षटकांत ७६ धावा जमवून ६ विकेट गमावले.
लखनऊचा नवा कर्णधार ऋषभ पंतला आपल्या फलंदाजीतून प्रभाव टाकता आला नाही. सहा चेंडूंत एकही धाव न काढता तो माघारी परतला. तसेच अखेरच्या षटकात त्याने एक स्टम्पिंगची संधी सोडली.
निकोलस पूरनने शानदार फलंदाजी केली. मिचेल मार्शने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना फोडून काढले. त्याने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या गोलंदाजांनी फारशी चूक केली नाही. मात्र हैदराबादविरुद्ध त्यांना अधिक सावध राहावे लागेल.
अनुभवी गोलंदाज रवी बिश्नोई, मनीमरन सिद्धार्थ आणि दिग्वेश राठी यांच्याकडून लखनऊला मोठी अपेक्षा असेल.
हंगामातील पाच सामन्यांत विक्रमी षटकार
हैदराबादकडे तगड्या फलंदाजांची मोट असून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी चुकीच्या टप्प्यावर चेंडू टाकल्यास त्यांना ते महाग पडणार हे निश्चित आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या पाच सामन्यांत विक्रमी ११९ षटकार लगावले गेले आहेत. त्यामुळे लखनऊला या सामन्यात धोरण आखून त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे. हैदराबादकडे तगड्या फलंदाजांची मोट असून प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी चुकीच्या टप्प्यावर चेंडू टाकल्यास त्यांना ते महाग पडणार हे निश्चित आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या पाच सामन्यांत विक्रमी ११९ षटकार लगावले गेले आहेत. त्यामुळे लखनऊला या सामन्यात धोरण आखून त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, ॲडम झाम्पा, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पडेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, मोहसिन खान, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप