वैभव सूर्यवंशीसाठी बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; ऐतिहासिक शतकासाठी मिळणार 'इतके' पैसे

नितीश कुमार यांनी राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करत, हा क्षण बिहारसाठी अभिमानाचा असल्याचेही म्हटले.
वैभव सूर्यवंशी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जुने छायाचित्र
वैभव सूर्यवंशी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जुने छायाचित्रएक्स (@NitishKumar)
Published on

आयपीएल २०२५ मध्ये सोमवारी (दि.२८) गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक झळकावणाऱ्या किशोरवयीन फलंदाज वैभव सूर्यवंशी (वय १४) याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार सरकारने अधिकृत घोषणा करत वैभवला १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. नितीश कुमार यांनी राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करत, हा क्षण बिहारसाठी अभिमानाचा असल्याचेही म्हटले.

सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, "आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात (१४ वर्षे) शतक झळकावणाऱ्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन आणि शुभेच्छा! मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर त्याने भारतीय क्रिकेटसाठी नवी आशा निर्माण केली आहे. सर्वांनाच त्याचा अभिमान आहे. २०२४ मध्ये वैभव आणि त्याच्या वडिलांची भेट झाली होती, त्यावेळी वैभवच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या."

फोनवरुन साधला संवाद

ऐतिहासिक कामगिरीनंतर फोनवरून वैभवशी संवाद साधून शुभेच्छाही दिल्याचे नितीश कुमार यांनी पुढे सांगितले. "आयपीएलमधील शानदार कामगिरीनंतर मी फोनवरून वैभवशी संवाद साधला आणि त्याचे अभिनंदन केले. बिहारच्या या युवा क्रिकेटपटूला राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांचे मानधन देखील दिले जाईल. भविष्यात वैभव भारतीय संघासाठी नवे कीर्तीमान प्रस्थापित करो आणि देशाचे नाव उज्ज्वल करो, अशी माझी शुभेच्छा आहे," असे त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी देखील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचे कौतुक करत, ही "सुंदर सुरुवात" असल्याचे सांगितले आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या १४ वर्षीय बिहारच्या या युवा फलंदाजाने फक्त तिसऱ्याच आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध जयपूरमध्ये ३८ चेंडूत १०१ धावा ठोकल्या. अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करून सूर्यवंशी आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकणारा भारतीय खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम युसुफ पठाणच्या नावावर होता, ज्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावले होते. वैभवच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा ८ गडी आणि २५ चेंडू राखून फडशा पाडला. गुजरातने दिलेले २१० धावांचे लक्ष्य राजस्थानने अवघ्या १५.५ षटकांत गाठले.

logo
marathi.freepressjournal.in