टी-२० मध्ये विराट कोहलीने गाठला विक्रमी टप्पा; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

मुंबई इंडियन्स विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात अर्धशतक (४२ चेंडूत ६७ धावा) झळकावत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी२० क्रिकेटमध्ये एक विक्रमी टप्पा ओलांडला.
टी-२० मध्ये विराट कोहलीने गाठला विक्रमी टप्पा; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
Published on

मुंबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात अर्धशतक (४२ चेंडूत ६७ धावा) झळकावत रॉयल चलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा विक्रमी टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोहलीचे हे दुसरे अर्धशतक ठरले. क्रिकेटच्या या छोट्या प्रकारात १३ हजार धावा करणारा विराट जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. उजव्या हाताच्या या खेळाडूने ४०३ सामन्यांत ही कामगिरी केली.

वानखेडेवर १० वर्षांनी मुंबईला नमवले

सोमवारी झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर मुंबईच्या कर्णधाराने घेतलेला हा निर्णय महागडा ठरला. सलामीवीर फिल सॉल्ट हा ट्रेंट बोल्टच्या गळाला पटकन लागला. पण त्यानंतर मात्र विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी मुंबईच्या गोलंदांवर चौफेर हल्ला चढवला. आरसीबीने पॉवरप्लेमध्ये १ फलंदाज गमावून ७२ धावा जमवल्या. मुंबईविरुद्ध पॉवरप्लेमधील बंगळुरूची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

कोहलीने ४२ चेंडूंत ६७ धावांची फटकेबाजी करत आरसीबीला धावांचा डोंगर उभा करून दिला. पाटीदारच्या ३२ चेंडूंत ६४ धावा आणि जितेश शर्माच्या १९ चेंडूंत ४० धावा यामुळे आरसीबीने ५ फलंदाज गमावून २२१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ गडी बाद २०९ धावाच करता आल्या. यंदाच्या हंगामातील हा आरसीबीचा चार सामन्यांतील तिसरा विजय तर मुंबईचा पाच सामन्यांतील चौथा पराभव ठरला. याशिवाय घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर आरसीबीने तब्बल १० वर्षांनी मुंबईला पराभूत केले. यापूर्वी २०१५ मध्ये आरसीबीने ३९ धावांनी मुंबईविरुद्धचा सामना जिंकला होता.

logo
marathi.freepressjournal.in