IPL 2025 : राजस्थानविरुद्ध हैदराबाद होणार रॉयल्स? हेड, अभिषेक, किशन, क्लासेनला रोखण्याचे आव्हान

तगडी बॅटींग लाईनअप, अनुभवी गोलंदाज यामुळे समतोल असलेला आणि गेल्या हंगामात अंतिम पराभूत ठरलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रविवारी सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे.
IPL 2025 : राजस्थानविरुद्ध हैदराबाद होणार रॉयल्स? हेड, अभिषेक, किशन, क्लासेनला रोखण्याचे आव्हान
Published on

हैदराबाद : तगडी बॅटींग लाईनअप, अनुभवी गोलंदाज यामुळे समतोल असलेला आणि गेल्या हंगामात अंतिम पराभूत ठरलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रविवारी सलामीच्या लढतीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात हैदराबादचा पगडा भारी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिच क्लासेन हे तगडे फलंदाज सनरायझर्सच्या ताफ्यात आहेत. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे.

दुखापतीतून परतलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. अभिषेक आणि हेड यांच्या फॉर्मचा विचार केल्यास त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध भारतात खेळल्या गेलेल्या अखेरच्या टी-२० सामन्यात अभिषेकने २५० च्या स्ट्राईक रेटने ५४ चेंडूंत १३५ धावांची वादळी खेळी खेळली होती. जोफ्रा आर्चर वगळता रॉयल्सच्या संघात तगडे गोलंदाज नाहीत. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास २५० पेक्षा अधिक धावा करण्याचे लक्ष्य सनरायझर्सचे असेल.गेल्या हंगामात सनरायझर्सने तीन वेळा २५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २८७ धावा, मुंबई इंडियन्सविरुद्ध २७७ धावा आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध २६६ धावा जमवल्या होत्या. पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान दुकलीसह फिरकीपटू ॲडम झाम्पा हे गोलंदाज हैदराबादमध्ये आहेत. बोटाच्या दुखापतीमुळे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या सामन्याला मुकू शकतो. तो खेळलाच तर त्याला क्षेत्ररक्षण करता येणार नाही. तो केवळ फलंदाजी करू शकतो. त्यामुळे इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तो खेळण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंडचा जोस बटलर बाहेर पडल्यामुळे रॉयल्सची फलंदाजी कमकुवत झाली आहे. तरीही संघात शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, नितीश राणा आणि यशस्वी जयस्वाल हे फलंदाज आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, ॲडम झाम्पा, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पडेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर. \

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महिष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in