
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा अखेर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रणांगणात परतणार आहे. सोमवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे. या लढतीसाठी बुमराचा मुंबईच्या संघात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे बुमराचे पुनरागमन आणि वानखेडेचे मैदान मुंबईसाठी ‘लकी’ ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
पाच वेळच्या विजेत्या मुंबई संघाने यंदाही अपेक्षेप्रमाणे काहीशी अडखळती सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने आतापर्यंत चारपैकी फक्त १ लढत जिंकली आहे. चेन्नई, गुजरातकडून पराभव पत्करल्यानंतर मुंबईने गेल्या सोमवारी कोलकाताला वानखेडेवर हरवले. मात्र शुक्रवारी लखनऊविरुद्ध मुंबईला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजांचा सुमार मारा, बेभरवशी फलंदाजी आणि घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे मुंबईच्या पदरी निराशा पडली. मात्र आता बुमरा संघात परतल्याने मुंबईची गोलंदाजीची चिंता मिटली असेल. मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्वत: याविषयी माहिती दिली.
“हो. बुमरा आगामी लढतीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याने सरावाला प्रारंभसुद्धा केलेला आहे. बुमराच्या समावेशाने संघात चैतन्याचे वातावरण पसरले असून सकारात्मक ऊर्जाही वाढली आहे. एनसीएकडून परवानगी मिळाल्यावरच तो संघात दाखल झाला आहे,” असे जयवर्धने म्हणाला. त्याशिवाय रोहित शर्माही नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. गेल्या लढतीला रोहित गुडघ्याच्या दुखापतीमुळे मुकला होता.
दुसरीकडे, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. कोलकाता व चेन्नईला धूळ चारल्यानंतर गेल्या लढतीत बंगळुरूला घरच्या मैदानात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. तसेच मुंबईविरुद्ध वानखेडेवर बंगळुरूला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे बंगळुरूचा संघ कशाप्रकारे पुनरागमन करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
वानखेडेवर धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे गेले आहे. येथे दवही येत असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होते. मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० ते २०० धावा केल्या, तर ते विजयही मिळवू शकतात. एकूणच सोमवारी रंगणाऱ्या मुंबई-बंगळुरू लढतीकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून आहे.
मुंबईसाठी फलंदाजीत फक्त सूर्यकुमार लयीत
मुंबईसाठी या हंगामात सूर्यकुमार यादवने ४ सामन्यांत सर्वाधिक १७१ धावा केल्या आहेत. मात्र त्याच्या व्यतिरिक्त अन्य एकाही फलंदाजाने जबाबदारीने खेळ केलेला नाही. विशेषत: तिलक वर्माला गेल्या सामन्यात संघर्ष करावा लागल्याने रिटायर्ड आऊट करण्यात आले होते. त्यामुळे तो वानखेडेवर कसा खेळेल, हे पहावे लागेल. रायन रिकल्टन, विल जॅक्स व रोहित या आघाडीच्या फलंदाजांकडून धावा अपेक्षित आहेत. गोलंदाजीत बुमरा, ट्रेंट बोल्ट व दीपक चहर यांचे वेगवान त्रिकुट घातक ठरू शकते. अश्वनी कुमार व विघ्नेश पुथूर यांचे पर्यायही मुंबईकडे आहेत.
विराट, पाटीदारवर बंगळुरूची प्रामुख्याने भिस्त
बंगळुरूच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने विराट कोहली व रजत पाटीदार यांच्यावर आहे. विराट आणि बुमरा यांच्यातील जुगलबंदी पाहण्यास मजा येईल. फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा असे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांच्यावर बंगळुरूची मदार आहे. बंगळुरूने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे ते मुंबईला कडवी झुंज देण्यास उत्सुक असतील.
बुमराला नेमके काय झाले होते?
३१ वर्षीय बुमराला जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पाठदुखी झाली होती. त्यामुळे तो ती कसोटी मध्यावर सोडूनच माघारी परतला. पाठदुखी गंभीर असल्याने बुमरा किमान एक महिना मैदानात परतणार नाही, हे स्पष्ट झाले.
मग बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बुमराच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले. बुमराला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागले. त्यावेळी मार्च अखेरपर्यंत बुमरा येईल, असे सांगण्यात आले.
मात्र आयपीएलच्या पहिल्या चार सामन्यांनाही बुमरा मुकला. अखेरीस रविवार, ६ एप्रिल रोजी बुमरा मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याने रविवारी कसून सरावही केला.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप