IPL 2026 : गुजरातपुढे बंगळुरूचे आव्हान; अहमदाबाद येथे उभय संघांत आज लढत; गिल-विराट यांच्यावर नजरा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कडवे आव्हान असेल.
IPL 2026 : गुजरातपुढे बंगळुरूचे आव्हान; अहमदाबाद येथे उभय संघांत आज लढत; गिल-विराट यांच्यावर नजरा
IPL 2026 : गुजरातपुढे बंगळुरूचे आव्हान; अहमदाबाद येथे उभय संघांत आज लढत; गिल-विराट यांच्यावर नजरा(Photo-@khelnow)
Published on

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कडवे आव्हान असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरणार असून प्रामुख्याने शुभमन गिल आणि विराट कोहली या तारांकितांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातची कामगिरी अद्याप संमिश्र स्वरुपाची राहिली आहे. त्यांनी आठपैकी चार लढती जिंकल्या आहेत, तर चार सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईला चेपॉकवर धूळ चारल्यावर आता हा संघ विजयी सातत्य कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. गुजरातचा संघ तूर्तास पाचव्या स्थानी आहे. गिल, साई सुदर्शन व जोस बटलर या आघाडीच्या त्रिकुटावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी, तर रशिद खान व वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी जोडी गुजरातकडे आहे. गुजरातच्या मधल्या फळीचा मात्र कस लागू शकतो.

दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता बंगळुरू संघ यंदादेखील बाद फेरीच्या दिशेने आरामात कूच करत आहे. ८ पैकी ६ सामने जिंकून बंगळुरू सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातवर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मात केली होती. आता परतीच्या लढतीतही ते गुजरातला नमवणार का, याकडे लक्ष असेल. बंगळुरूचे चिन्नास्वामीवरील सर्व लढती झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता प्रतिस्पर्ध्याच्या मैदानातच अधिक लढती खेळायच्या आहेत.

फिल सॉल्टच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल व विराट यांची जोडी सातत्याने छाप पाडत आहे. तसेच पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा असे फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजी बंगळुरूची जमेची बाजू आहे. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर बंगळुरूने दिल्लीला ७५ धावांत गुंडाळले होते. तसेच कृणाल पंड्या व सूयश शर्मा यांची फिरकी जोडी घातक ठरत आहे. त्यामुळेच बंगळुरूला रोखणे गुजरातसाठी सोपे नसेल.

खेळपट्टीचा अंदाज

अहमदाबादला होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट नसेल. तसेच येथे दव येत असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते. मात्र काळ्या मातीची खेळपट्टी असल्यास १८ ते १९० धावा विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. मुंबईने गुजरातला अशाच खेळपट्टीवर नमवले होते.

उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने ४, तर गुजरातने ३ लढती जिंकल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील सामन्यात बंगळुरूने बाजी मारली होती. त्यामुळे आता गुजरात पलटवार करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा, यश दयाल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in