

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रत्येक लढत रंगतदार आणि निर्णायक ठरणार आहे. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अग्रस्थानासाठी दोन संघांमध्ये घमासान पाहायला मिळेल. यजमान गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावण्यासह बाद फेरीत एक पाऊल टाकण्याच्या उद्दिष्टाने मंगळवारी मैदानात उतरतील.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने ११ पैकी ७ लढती जिंकल्या आहेत. मुख्य म्हणजे सुरुवातीच्या सातपैकी फक्त चारच सामन्यांत गुजरातने विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर सलग विजयी चौकार लगावून या संघाने अव्वल चार संघांत मुसंडी मारली आहे. आघाडीच्या त्रिकुटाच्या बळावर गुजरातने मोठी धावसंख्या उभारली आहे किंवा धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला आहे. गिल, साई सुदर्शन व जोस बटलर लयीत आहेत. जेसन होल्डरचा समावेश झाल्यापासून हा संघ सातत्याने कमाल करत आहे. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया चमक दाखवू लागले आहेत. कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज यांची वेगवान जोडी, तर फिरकीपटू रशिद खान यांची ताकद आहे. त्यामुळे गुजरातला घरच्या मैदानात रोखणे हैदराबादसाठी सोपे नसेल.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादनेसुद्धा ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी पंजाबला धूळ चारली. सुरुवातीच्या ४ मधून फक्त १ लढत जिंकणाऱ्या हैदराबादने नंतर हंगामा करताना पुढील ७ पैकी सहा लढती जिंकल्या. इशान किशनने काही लढतींमध्ये नेतृत्व केल्यावर कमिन्सच्या नेतृत्वातही हा संघ आगेकूच करत आहे. किशनसह अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड व हेनरिच क्लासेन असे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत इशान मलिंगा, कमिन्स, साकिब हुसैन व प्रफुल्ल हिंगे यांची वेगवान चौकडी आग ओकत आहे. फिरकीपटू शिवांग कुमार व हर्ष दुबेचा पर्यायही हैदराबादकडे आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ मंगळवारी आठवा विजय नोंदवून बाद फेरीतील प्रवेश जवळपास पक्का करण्यासाठी आतुर असेल.
खेळपट्टीचा अंदाज
मंगळवारी होणाऱ्या लढतीसाठी काळ्या मातीची खेळपट्टी वापरण्यात येणार आहे. मुंबईने याच खेळपट्टीवर गुजरातला नमवले होते. येथे धावांचा पाठलाग करणे कठीण जाऊ शकते. गेल्या ८ पैकी सहा टी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी गुजरातने ५, तर हैदराबादने फक्त १ लढत जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारी सध्या गुजरातच्या बाजूने असली, तरी हैदराबादसुद्धा उत्तम लयीत असल्याने चाहत्यांना रंगतदार लढत अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे, आर. अंब्रिश.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप