

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील शेवटच्या जागेची शर्यत कमालीची रंगली असताना रविवारी होणाऱ्या मोसमातील अंतिम साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरतील.
सद्यस्थितीत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेला कोलकाता आणि आठव्या स्थानावरील दिल्ली कॅपिटल्सचा संघ तांत्रिकदृष्ट्या प्लेऑफच्या शर्यतीत जिवंत असला, तरी रविवारी सामना सुरू होईपर्यंत हा सामना केवळ औपचारिकता ठरू शकतो. प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर असलेला पंजाब किंग्जचा संघ शनिवारी आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.
या सामन्यात पंजाबने विजय मिळवल्यास त्यांचे पंधरा गुण होतील आणि दिल्लीचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात येईल, कारण दिल्लीचा संघ जास्तीत जास्त चौदा गुणांपर्यंतच पोहोचू शकतो. तेरा नाइट रायडर्सला दिल्लीवर विजय गुणांवर असलेल्या कोलकाता मिळवून पंधरा गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे, परंतु पंजाबचा नेट रनरेट त्यांच्यापेक्षा पंजाबने बराच चांगला आहे. लखनऊवर अवघ्या एक धावेने विजय मिळवला तरी कोलकात्याला त्यांचा नेट रनरेट मागे टाकण्यासाठी दिल्लीविरुद्ध किमान ५२ धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे लखनऊच्या विजयानंतरच ईडन गार्डन्सवरील या सामन्याचे महत्त्व रविवारी कायम राहू शकेल. त्यातच लखनऊने विजय मिळवला, तरी कोलकाता आणि दिल्ली या दोन्ही संघांना मुंबई इंडियन्सने दुपारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करावा अशी अपेक्षा ठेवावी लागेल. सध्या चौदा गुणांवर असलेला राजस्थानचा संघ विजय मिळवून थेट सोळा गुणांसह प्लेऑफमधील शेवटची जागा निश्चित करू शकतो. अशा अनेक समीकरणांचे भवितव्य स्वतःच्या हातात नसताना, दोन्ही संघ पात्रता समीकरणांचा विचार करण्यापेक्षा विजयासह या मोसमाचा शेवट सकारात्मक करण्यावर अधिक भर देतील.
कोलकाताला या सामन्यात त्यांचा प्रमुख फलंदाज अंगरिक्ष रघुवंशी याच्याशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. रघुवंशीने यंदाच्या हंगामात पाच अर्धशतकांसह ४२२ धावा केल्या आहेत. याशिवाय रहस्यमयी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या खेळण्याबाबत सामन्यापूर्वी निर्णय घेतला जाईल. गत ८ मे रोजी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात वरुणच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यानंतर वेदना होत असतानाही तो पुढील दोन सामने खेळला होता, ज्याची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही घेतली आहे.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम चढ-उतारांचा राहिला आहे. दिल्लीची फलंदाजी प्रामुख्याने केएल राहुलवर अवलंबून असून त्याने १३ डावांमध्ये १७१ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ५३३ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल अपयशी ठरल्यास दिल्लीचा डाव गडगडतो, असेच चित्र अनेकदा दिसले आहे. डेव्हिड मिलरच्या पुनरागमनामुळे मधल्या फळीला काहीशी स्थिरता मिळाली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने २८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली होती. मात्र, दिल्लीच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. कर्णधार अक्षर पटेलने ३२.३० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या आहेत, तर कुलदीप यादवला ५०.२८ च्या सरासरीने अवघ्या सात विकेट्स मिळवता आल्या आहेत. असे असले तरी, पंजाब आणि राजस्थान रॉयल्सवरील सलग दोन विजयांमुळे दिल्लीचा आत्मविश्वास उंचावला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.
कोलकाता नाइट: रायडर्स अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन अॅलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.
वेळ : दुपारी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप