IPL 2026: कोलकाताला पहिल्या विजयाची आशा; गुजरातला आज घरच्या मैदानावर सूर गवसणार?

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी क्रमांक-६ वर हा पहिलाच सामना खेळवला जाणार आहे.
IPL 2026:  कोलकाताला पहिल्या विजयाची आशा; गुजरातला आज घरच्या मैदानावर सूर गवसणार?
संग्रहित
Published on

अहमदाबाद : सलग पराभवांमुळे गुणतालिकेत तळाच्या स्थानी पोहोचलेल्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी कोलकाताची गाठ फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात दोन सामने जिंकल्यानंतर गुजरातला आता घरच्या मैदानावर पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कोलकाताला पहिल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला असून त्यांच्या खात्यात फक्त एका गुणाची भर पडली आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी तीन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता संघ उत्सुक आहे.

गुजरातचा संघ चार सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. आयपीएलला सुरुवात होण्याआधी हर्षित राणा आणि आकाश दीप यांना झालेली दुखापत तसेच ‘बीसीसीआय’च्या सूचनेनुसार बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला कोलकाता संघातून मुक्त केल्याने त्यांची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. फिरकीपटू सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांना अद्यापही अपेक्षित सूर न गवसल्यामुळे कोलकाताच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

मैदानात मोक्याच्या क्षणी निर्णय घेण्याच्या क्षमतेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, टीम साऊदी आणि रचिन रवींद्र यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात रहाणेने प्रथम फलंदाजी निवडली होती, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हे दोन्ही निर्णय संघाच्या विरोधात गेले आहेत.

२५.२० कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून खरेदी केलेला कॅमेरून ग्रीन अद्याप प्रभाव पाडू शकलेला नाही. त्याने पाच डावांत केवळ ५६ धावा केल्या असून गोलंदाजीमध्येही तो फारसा प्रभावी ठरलेला नाही. फलंदाजीच्या क्रमात केलेले बदलही ‘केकेआर’साठी यशस्वी ठरले नाहीत. राखीव फळीत मनीष पांडे, राहुल त्रिपाठी आणि सार्थक रंजन यांसारखे अनुभवी खेळाडू असूनही त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही.

दुसरीकडे, गुजरात टायटन्सलाही अद्याप घरच्या मैदानावर विजय मिळवता आलेला नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा घरचा सामना गमावल्यानंतर गुजरातने दोन अवे सामन्यांत विजय मिळवून आपला आत्मविश्वास उंचावला आहे. प्रसिध कृष्णाची मधल्या आणि शेवटच्या षटकातील प्रभावी गोलंदाजी आणि फिरकीपटू रशीद खानला गवसलेला सूर ही गुजरातसाठी जमेची बाजू आहे.

खेळपट्टी कशी असेल?

नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी क्रमांक-६ वर हा पहिलाच सामना खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत पोषक होती. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी टप्प्यावर चेंडू आदळल्यास त्यांना अतिरिक्त उसळी मिळण्याची शक्यता आहे. सामन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात स्विंग पाहायला मिळू शकतो, मात्र तो तितक्याच वेगाने कमी होतो. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही. खेळपट्टीचे स्वरूप पाहता, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करून धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देऊ शकतो.

- गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन याला आयपीएलमध्ये २०० चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १ चौकाराची आवश्यकता आहे. तसेच आयपीएलमध्ये २ हजार धावा करण्यासाठी त्याला ९४ धावा हव्यात.

- गुजरातचा स्फोटक फलंदाज जोस बटलर याला आयपीएलमध्ये २०० षटकार ठोकण्यासाठी आता ८ षटकार हवे असून टी-२०मध्ये ३०० झेल पकडण्याचा टप्पा गाठण्यासाठी फक्त १ झेल हवा आहे.

प्रतिस्पर्धी संघ

-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया.

-कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून

logo
marathi.freepressjournal.in