IPL 2026 : पंजाबची हॅटट्रिक की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्ससमोर पंजाब किंग्जचे कडवे आव्हान असेल. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत पंजाब विजयाची हॅटट्रिक साकारणार की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार, हे पाहणे रंजक ठरेल. या लढतीच्या निमित्ताने दोन मुंबईकर कर्णधारांमधील द्वंद्वही चाहत्यांना पाहायला मिळेल.
पंजाबची हॅटट्रिक की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार?
पंजाबची हॅटट्रिक की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार?
Published on

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्ससमोर पंजाब किंग्जचे कडवे आव्हान असेल. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत पंजाब विजयाची हॅटट्रिक साकारणार की कोलकाता सलग तिसरा पराभव टाळणार, हे पाहणे रंजक ठरेल. या लढतीच्या निमित्ताने दोन मुंबईकर कर्णधारांमधील द्वंद्वही चाहत्यांना पाहायला मिळेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.

दरम्यान, मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात गतउपविजेत्या पंजाबने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही लढतींमध्ये पंजाबने धावांचा यशस्वी पाठलाग केला. गत‌वर्षी पंजाबने १११ धावांचा बचाव करताना कोलकाताला ९५ धावांत गुंडाळत संस्मरणीय विजय नोंदवला होता. आता पुन्हा ते त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास आतुर असतील. श्रेयससह प्रियांश आर्य, कूपर कोनोली, अर्शदीप सिंग, व युझवेंद्र चहल या खेळाडूंवर पंजाबची भिस्त आहे.

दुसरीकडे मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला यंदाच्या हंगामात अनुक्रमे मुंबई, हैदराबाद यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कोलकाता गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांत असून त्यांना अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. पंजाबविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्याची त्यांना संधी आहे. कोलकाताचे फिन अॅलन व अंक्रिश रघुवंशी उत्तम लयीत आहेत. मात्र रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती व सुनील नरिन यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

उभय संघांत आतापर्यंत ३५ सामने झाले असून कोलकाताने २१, तर पंजाबने १३ लढती जिंकल्या आहेत. १ सामना रद्द करण्यात आला होता.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, उमरान मलिक, नवदीप सैनी.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

logo
marathi.freepressjournal.in