IPL 2026 : तळाच्या कोलकाताविरुद्ध बेधडक राजस्थानचे पारडे जड

आयपीएलमध्ये दुपारी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघ विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक असेल. ईडन गार्डन्स स्टेडियमवर त्यांची कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध लढत होईल. कोलकाताचा संघ हंगामातील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
IPL 2026 : तळाच्या कोलकाताविरुद्ध बेधडक राजस्थानचे पारडे जड
X
Published on

कोलकाता : आयपीएलमध्ये दुपारी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघ विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक असेल. ईडन गार्डन्स स्टेडियमवर त्यांची कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध लढत होईल. कोलकाताचा संघ हंगामातील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी २० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने सुरुवातीचे सलग चारही सामने जिंकले होते. मात्र हैदराबादविरुद्ध त्यांना हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला. आता जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर हा संघ मैदानात दिसणार असून ते पाचवा विजय नोंदवण्यासाठी आतुर असतील. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल यांच्यावर राजस्थानची फलंदाजी अवलंबून असून पराग, ध्रुव जुरेल, शिम्रॉन हेटमायर यांच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे. तसेच गोलंदाजीत रवींद्र जडेजाचा फारसा वापर झालेला नाही. जोफ्रा आर्चर व रवी बिश्नोई मात्र सातत्याने छाप पाडत आहेत. तुषार देशपांडे किंवा संदीप शर्मा यांच्यापैकी एकाला वगळले जाऊ शकते.

दुसरीकडे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताला सहापैकी ५ लढतींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. फक्त पंजाबविरुद्ध लढत रद्द झाल्याने त्यांच्या नावावर किमान एक गुण जमा आहे. फलंदाजांचे अपयश कोलकाताला सातत्याने महागात पडले आहे. तसेच गोलंदाजांनीही फारशी चमक दाखवलेली आहे. कॅमेरून ग्रीनला सूर गवसला असला तरी रहाणे, रिंकू सिंग यांनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. गोलंदाजीत प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती कोलकाताला जाणवत असून वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती यांनी सपशेल निराशा केली आहे. कार्तिक त्यागीने फक्त प्रभावित केले आहे. कोलकाताने आता लय मिळवली नाही, तर पुढील १-२ सामन्यांतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in