IPL 2026 : कोलकाताने कात टाकली; पंजाब, राजस्थानवर दडपण

कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला ४ गडी व ७ चेंडू राखून पराभूत केले.
IPL 2026 : कोलकाताने कात टाकली; पंजाब, राजस्थानवर दडपण
IPL 2026 : कोलकाताने कात टाकली; पंजाब, राजस्थानवर दडपण(Photo-X)
Published on

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सला ४ गडी व ७ चेंडू राखून पराभूत केले. कोलकाताने या विजयासह कात टाकताना पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स या संघांवर दडपण वाढवले आहे. मनीष पांडे (३३ चेंडूंत ४५ धावा) कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

ईडन गार्डन्सवर झालेल्या या लढतीत कोलकाताने मुंबईला २० षटकांत ८ बाद १४७ धावांत रोखले. कॉर्बिन बोशने १८ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या. सौरभ दुबे, कार्तिक त्यागी व कॅमेरून ग्रीन या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. त्यानंतर कोलकाताने १८.५ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. ३ बाद ५४ स्थितीतून मनीष व रोवमन पॉवेल (४०) यांनी चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. मुंबईकडून बोशने ३ बळी मिळवले. मात्र कोलकाताने तरीही विजय मिळवला.

आता १३ सामन्यांतील १३ गुणांसह कोलकाता गुणतालिकेत सहाव्या स्थानी असून त्यांची रविवारी अखेरच्या साखळी लढतीत दिल्लीशी गाठ पडेल. पंजाब (१३) व राजस्थान (१४) कोलकातापुढे आहेत. या दोन्ही संघांनी आपली शेवटची लढत गमावली व कोलकाताने मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर ते बाद फेरीत प्रवेश करू शकतात. पंजाबची अखेरची लढत शनिवारी लखनऊविरुद्ध होईल, तर राजस्थानची रविवारी दुपारी मुंबईशी गाठ पडेल. या दोन्ही लढतींवर कोलकाताचे बारीक लक्ष असेल.

असे चित्र पालटले

पंजाबचा सध्याचा कर्णधार श्रेयस अय्यर हा २०२४मध्ये कोलकाताचा कर्णधार होता. त्यावेळी कोलकाताने आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र अंतर्गत वादामुळे कोलकाताने श्रेयसला संघात कायम राखले नाही. यंदा सुरुवातीच्या सात सामन्यांनंतर (२५ एप्रिल रोजी) पंजाबचा संघ ७ सामन्यांतील ६ विजय व १ रद्द लढत अशा एकूण १३ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी होता. त्याचवेळी कोलकाता ७ सामन्यांतील १ विजय, १ रद्द लढत अशा फक्त ३ गुणांसह गुणतालिकेत १०व्या स्थानी होता. कोलकाता-पंजाब यांच्यातीलच लढत पावसामुळे रद्द झाली होती. त्यावेळी पंजाबने कोलकाता संघाची हुर्यो उडवताना त्यांना एक गुण मोफत दिल्याचे सांगितले होते. मात्र आता १३ सामन्यानंतर कोलकाता व पंजाब दोघांचेही १३-१३ गुण आहेत. पंजाबने सलग सहा लढती गमावल्या, तर कोलकाताने सातपैकी सहा सामने जिंकून कमबॅक करून दाखवले. त्यामुळे २५ दिवसांत गुणतालिकेचे चित्र पालटले आहे.

दिल्लीचे पॅकअप?

कोलकाता आणि राजस्थान या संघांनी आपापल्या लढती जिंकल्याने दिल्लीचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. दिल्लीचे सध्या १३ सामन्यांत १२ गुण आहेत. मात्र शेवटची लढत जिंकली तरी १४ गुणांसह ते पात्र ठरण्याची शक्यता फार कमी आहे. कारण दिल्लीची धावगती -०.८७१ इतकी आहे. अशा स्थितीत त्यांना कोलकाताविद्ध तब्बल १८०हून अधिक धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागेल. तसेच धावांचे लक्ष्य २.३ षटकांत गाठावे लागेल. या दोन्ही गोष्टी जवळपास अशक्य दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in