IPL 2026 : कोलकाताच्या बाद फेरीच्या मार्गात आज मुंबईचा अडथळा

आयपीएलमध्ये बुधवारी होणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले.
IPL 2026 : कोलकाताच्या बाद फेरीच्या मार्गात आज मुंबईचा अडथळा
IPL 2026 : कोलकाताच्या बाद फेरीच्या मार्गात आज मुंबईचा अडथळा
Published on

कोलकाता : आयपीएलमध्ये बुधवारी होणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले. मात्र ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीत त्यांच्यापुढे मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. त्यामुळे कोलकाताच्या मार्गात मुंबई अडथळा ठरणार का, याकडे लक्ष असेल.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने सुरुवातीच्या सहापैकी एकही लढत जिंकली नव्हती. त्यांच्या नावावर फक्त पंजाबविरुद्धच्या रद्द लढतीचा एक गुण होता. मात्र त्यानंतर कोलकाताने पलटवार करताना गेल्या सहापैकी पाच लढती जिंकल्या आहेत. १२ सामन्यांत ११ गुणांसह ते अद्यापही बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत. त्यामुळे मुंबई आणि दिल्ली यांच्याविरुद्ध उर्वरित दोन्ही लढती जिंकून कोलकाताला बाद फेरी गाठण्याची संधी आहे.

सलामीवीर फिन, मुंबईकर अंक्रिश रघुवंशी व अनुभवी कॅमेरून ग्रीन यांच्यावर कोलकाताची फलंदाजी अवलंबून आहे. कोलकाताने गेल्याच लढतीत गुजरातला धक्का दिला होता. त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा छाप पाडण्यास ते आतुर असतील. मधल्या फळीत रिंकू सिंग, रोवमन पॉवेल व मनीष पांडे त्यांच्याकडे आहेत. कर्णधार रहाणेच्या कामगिरीची मात्र नक्कीच कोलकाताला चिंता आहे. सुनील नरिन व वरुण चक्रवर्ती यांची फिरकी जोडी कोलकाताची ताकद आहे. मथीशा पाथिरानाची दुखापत मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. कार्तिक त्यागी व सौरभ दुबे असे प्रतिभावान वेगवान गोलंदाज कोलकाताचा भार वाहत आहेत.

दुसरीकडे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी ते गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करत आहेत. मुंबईने काही दिवसांपूर्वी पंजाबला धक्का दिला. आता कोलकाताविरुद्धच विजयाने या हंगामाची सुरुवात करणारा मुंबईचा संघ पुन्हा एकदा त्यांना नमवण्यासाठी आतुर असेल. सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या लढतीसाठी परतण्याची शक्यता आहे. तिलक वर्मा, रायन रिकल्टन व रोहित शर्मा यांच्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर व दीपक चहर यांचे वेगवान त्रिकुट, तर फिरकीपटू रघू शर्मावर मुंबईची मदार आहे.

दरम्यान, उभय संघांतील आजवरच्या ३६ सामन्यांत मुंबईने २५ वेळा बाजी मारली आहे. तर कोलकाताने ११ लढती जिंकल्या आहेत. कोलकाताने २०२४मध्ये मुंबईला अखेरचे नमवले होते. त्यामुळे आता दोन वर्षांनी मुंबईला पुन्हा पराभूत करण्यास ते सर्वस्व पणाला लावतील.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, फिन ॲलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in