IPL 2026 : शमी, पंत लखनऊचे तारणहार! संघर्षानंतर हैदराबादवर ५ गडी राखून सरशी; हंगामातील पहिला विजय

अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (९ धावांत २ बळी) केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने ५० चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी दुपारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.
IPL 2026 : शमी, पंत लखनऊचे तारणहार! संघर्षानंतर हैदराबादवर ५ गडी राखून सरशी; हंगामातील पहिला विजय
Published on

हैदराबाद : अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (९ धावांत २ बळी) केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने ५० चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी दुपारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. त्यांनी हैदराबादला ५ गडी व १ चेंडू राखून पराभूत केले.

हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत हैदराबादला २० षटकांत ९ बाद १५६ धावांत रोखल्यावर लखनऊने १९.५ षटकांत विजय मिळवला. लखनऊचा हा दोन सामन्यांत पहिला विजय ठरला. त्यांना सुरुवातीला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे हैदराबादला तीन लढतींमध्ये दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगळुरूकडून पराभव स्वीकारल्यावर हैदराबादने कोलकाताला नमवले होते. मात्र रविवारी त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली. शमीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.

दरम्यान, शमीने पहिल्या तीन षटकांतच अभिषेक शर्मा (०) व ट्रेव्हिस हेड (७) यांचे अडसर दूर केले. त्यानंतर प्रिन्स यादवने इशान किशनचा (१) त्रिफळा उडवला. लियाम लिव्हिंगस्टोनही (१४) छाप पाडू शकला नाही. १० षटकांनंतर हैदराबादची ४ बाद ३५ अशी अवस्था होती. मात्र हेनरिच क्लासेन (४१ चेंडूंत ६२) आणि नितीश रेड्डी (३३ चेंडूंत ५६) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. त्यामुळे हैदराबादने किमान १५० धावांचा पल्ला गाठला. मग पंतने अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडून लखनऊचा विजय साकारला. एडीन मार्करम (४५) व अब्दुल समद (१६) यांनीही उत्तम योगदान दिले. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी निराशा केली होती. मात्र पंतने उनादकटला चौकार लगावून लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

(हैदराबाद वि. लखनऊ सामन्यापर्यंत)

logo
marathi.freepressjournal.in