

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मिनी ऑक्शनपूर्वी चाहत्यांसह संघमालकांना आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि इंग्लंडचा मोईन अली या अनुभवी अष्टपैलूंनी मंगळवारी लिलावातून माघार घेतली आहे. दोघांनीही लिलावासाठी नाव नोंदवलेले नाही.
आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठी १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आधीच कोलकाताचा आंद्रे रसेल व दिल्लीचा फॅफ डूप्लेसिस यांनी या लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. रसेल कोलकाताचा पॉवर कोच म्हणून दिसेल, तर डूप्लेसिसने वाढते वय व स्पर्धेचा विचार करता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगला प्राधान्य दिले. त्यामुळे लिलावात अधिक रक्कम घेऊन येणाऱ्या संघांकडे खरेदी करण्यासाठी पर्याय कमी झाले आहेत.
आता ३८ वर्षीय इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीनेदेखील पीएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८पासून मोईन आयपीएलमधील विविध संघांचा भाग होता. त्याने २०२१ व २०२३ मध्ये चेन्नईला जेतेपद मिळवून देण्यातही मोलाची भूमिका बजावली. गतवर्षी मोईन कोलकाता संघाचा भाग होता. मात्र त्याला फार कमी सामन्यांत संधी लाभली.
दुसरीकडे मॅक्सवेलने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय मॅक्सवेल गतवर्षी पंजाब संघाचा भाग होता. मात्र त्याने फारशी छाप पाडली नाही. मॅक्सवेल गेल्या वर्षभरात विविध दुखापतींनाही सामोरा गेला आहे. त्यामुळेच मॅक्सवेलने सर्व संघांची ओळख लक्षात घेता स्वत:हून नाव नोंदवलेले नाही. गेल्या चार वर्षांत एकदाच मॅक्सवेलला संपूर्ण हंगामात ५००हून अधिक धावा करता आल्या आहेत.
आता रसेल, डूप्लेसिस, मॅक्सवेल, मोईन यांसारखे खेळाडू लिलावात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन, श्रीलंकेचा मथीशा पाथिराना, वानिंदू हसरंगा यांच्यासाठीही संघमालक मोठी बोली लावू शकतात.
भारतीय खेळाडूंचा विचार करता फक्त वेंकटेश अय्यर व रवी बिश्नोई या दोघांनीच मूळ किंमत (बेस प्राइज) २ कोटी इतकी ठेवली आहे. त्यामुळे या दोघांसाठीही संघमालक मोठी बोली लावतील.