

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता निर्णायक वळणावर आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण बदलत आहे. त्यातच पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ तळाच्या दोन संघांत असून त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता जवळपास प्रत्येक लढत महत्त्वाची आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईची सनरायजर्स हैदराबादशी गाठ पडणार आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा हाराकिरी करणार की यावेळी हंगामा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सातपैकी फक्त दोन सामने जिंकले असून पाच लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईच्या अनुभवी खेळाडूंना अद्याप छाप पाडता आलेली नाही. चेन्नईविरुद्ध गेल्या लढतीत मुंबईचा संघ वानखेडेवरच जेमतेम १०० धावांत गारद झाला. सूर्यकुमार यादव, हार्दिक यांचा सातत्याने संघर्ष सुरू असून रोहित शर्माला झालेली दुखापत मुंबईसाठी आणखी चिंतेचा विषय ठरली आहे. रोहित बुधवारी परतेल की नाही, याबाबतही शंका आहे. अशा स्थितीत तिलक वर्मा, क्विंटन डीकॉक यांच्यावर प्रामुख्याने मुंबईची फलंदाजी अवलंबून असेल. नमन धीरकडून सातत्य अपेक्षित आहे. रोहितच्या अनुपस्थितीत संधी लाभलेल्या दानिश मलेवारने अद्याप निराशा केलेली आहे. त्यामुळे बुधवारी तरी तो आक्रमक सुरुवात करणार का, यावर मुंबईकरांचे लक्ष असेल.
गोलंदाजीत तारांकित जसप्रीत बुमराला सूर गवसला आहे. फिरकीपटू अल्लाह गझनफर हुकमी एक्का ठरत आहे. मिचेल सँटनर मात्र दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाच्या बाहेर गेला आहे. अशा स्थितीत विल जॅक्स किंवा केशव महाराजपैकी एकाला मुंबईच्या संघात संधी मिळू शकते.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने ८ पैकी ५ सामने जिंकले असून ते बाद फेरीच्या दिशेने योग्या मार्गावर आहेत. कमिन्स गेल्या सामन्यात परतल्यावर हैदराबादने राजस्थानला धूळ चारली. अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिच क्लासेन हे फलंदाज सातत्याने धुमाकूळ घालत आहेत. तसेच गोलंदाजीत इशान मलिंगा, साकिब हुसैन व प्रफुल्ल हिंगे यांचे वेगवान त्रिकुट प्रभावी ठरत आहे. हर्ष दुबे आणि शिवांग कुमार यांचा फिरकी पर्यायही हैदराबादकडे उपलब्ध आहे. एकूणच हैदराबादचा संघ सध्या उत्तम लयीत असल्याने मुंबई त्यांना कितपत झुंज देणार, याकडे लक्ष असेल.
उभय संघांत आतापर्यंत २५ सामने झाले आहेत. त्यांपैकी मुंबईने १५, तर दिल्लीने १० लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी मुंबईच्या बाजूने असली, तरी सध्या हैदराबादचा संघ लयीत आहे. त्यामुळे उभय संघांतील लढत रंगतदार होईल.
खेळपट्टीचा अंदाज
वानखेडेवर होणाऱ्या या लढतीत पावसाचे सावट नक्कीच नसेल. मात्र दवाचा परिणाम जाणवू शकतो. वानखेडेवर यंदा झालेल्या चारपैकी २ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करणाराच संघ जिंकेल, असे निश्चित नसेल.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप