

अबूधाबी : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १९व्या पर्वासाठी मंगळवारी अबुधाबी येथे खेळाडूंचे मिनी ऑक्शन रंगणार आहे. यंदा ३५० खेळाडू लिलावाच्या रिंगणात उतरणार असून त्यांपैकी १० संघांत मिळून फक्त ७७ खेळाडूंचीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे कुणाचे नशीब पालटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरवर्षीप्रमाणे २०२६मध्येही मार्च ते मे महिन्यात आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यासाठी यावेळी मिनी ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५च्या आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन झाले होते. कारण त्यावेळी संघांना आपल्याकडे ४-५ खेळाडू राखण्याचीच मुभा होती. मात्र यावेळी बहुतांश संघांनी लिलावापूर्वीच १५ ते २० खेळाडू संघात कायम राखले आहेत. आता थेट २०२८च्या आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होईल. तोपर्यंत लहानश्या स्वरूपाचे एकदिवसीय मिनी ऑक्शनच घेण्यात येईल.
दरम्यान, कोलकाताचा आंद्रे रसेल व दिल्लीचा फॅफ डूप्लेसिस यांनी या लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. रसेल कोलकाताचा पॉवर कोच म्हणून दिसेल, तर डूप्लेसिसने वाढते वय व स्पर्धेचा विचार करता आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगला प्राधान्य दिले. त्यामुळे लिलावात अधिक रक्कम घेऊन येणाऱ्या संघांकडे खरेदी करण्यासाठी पर्याय कमी झाले आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल व इंग्लंडचा मोईन अली यांनीदेखील माघार घेतली.
आता रसेल, डूप्लेसिस, मॅक्सवेल, मोईन यांसारखे खेळाडू लिलावात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन, श्रीलंकेचा मथीशा पाथिराना, वानिंदू हसरंगा, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक यांच्यासाठीही संघमालक मोठी बोली लावू शकतात. भारतीय खेळाडूंचा विचार करता फक्त वेंकटेश अय्यर व रवी बिश्नोई या दोघांनीच मूळ किंमत (बेस प्राइज) २ कोटी इतकी ठेवली आहे. त्यामुळे या दोघांसाठीही संघमालक मोठी बोली लावतील.
गेल्या महिन्यात सर्व संघांनी आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. पंजाबने सर्वाधिक २१, तर मुंबई व गुजरातने प्रत्येकी २० खेळाडू रिटेन केले आहेत. चेन्नई व कोलकाता हे संघ सर्वाधिक रकमेसह ऑक्शनमध्ये येतील. चेन्नईने संजू सॅमसनला संघात आणताना रवींद्र जडेजा व सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले. हा सर्वात मोठा ट्रेड ठरला.
आयपीएलचे आतापर्यंत १८ हंगाम झाले असून मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी ५ वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. गतवर्षी विराट कोहलीच्या बंगळुरूने पंजाबला नमवून प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावले. २०२६चे वर्ष टी-२० क्रिकेटने भरलेले असणार आहे. विश्वचषकानंतर आयपीएलची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळेच आता मंगळवारी होणाऱ्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
२४० भारतीय, ११० विदेशी खेळाडू
३५० खेळाडूंमध्ये २४० भारतीय, तर ११० विदेशी खेळाडू आहेत. तसेच २ कोटी मूळ किंमत असलेले एकूण ४० खेळाडू लिलावाचा भाग असतील. ऑस्ट्रेलियाचा ग्रीन, भारताचा सर्फराझ खान, पृथ्वी शॉ, आफ्रिकेचा डेव्हिड मिलर हे खेळाडू पहिल्याच सेटमध्ये लिलावात दिसतील. मल्लिका सागर यावेळीही ऑक्शनचे सूत्रसंचालन करणार आहे.
या देशी-विदेशी खेळाडूंवर नजरा
-कॅमेरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) : मध्यमगती अष्टपैलू (२ कोटी मूळ किंमत)
-लियाम लिव्हिंगस्टोन (इंग्लंड) : फिरकी अष्टपैलू
-रवी बिश्नोई (भारत) : लेगस्पिनर, उत्तम क्षेत्ररक्षक
-जेमी स्मिथ (इंग्लंड) : सलामीवीर, यष्टिरक्षक
-अक्यूब नबी (भारत) : वेगवान गोलंदाज
-आकाश शर्मा (भारत) : वेगवान गोलंदाज
सर्व संघांकडे शिल्लक रक्कम
. मुंबई : २.७५ कोटी (५ खेळाडू घेण्याची मुभा)
. चेन्नई : ४३.४० कोटी (९ खेळाडू घेण्याची मुभा)
. बंगळुरू : १६.४० कोटी (८ खेळाडू घेण्याची मुभा)
. कोलकाता : ६४.३० कोटी (१३ खेळाडू घेण्याची मुभा)
. दिल्ली : २१.८० कोटी (८ खेळाडू घेण्याची मुभा)
. गुजरात : १२.९० कोटी (५ खेळाडू घेण्याची मुभा)
. लखनऊ : २२.९५ कोटी (६ खेळाडू घेण्याची मुभा)
. पंजाब : ११.५० कोटी (४ खेळाडू घेण्याची मुभा)
. राजस्थान : १६.०५ कोटी (९ खेळाडू घेण्याची मुभा)
. हैदराबाद : २५.५० कोटी (१० खेळाडू घेण्याची मुभा)
वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून , थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स