IPL 2026, PBKS vs DC : श्रेयसच्या पंजाबला पुन्हा सूर गवसणार...की अक्षरची दिल्ली बाजी मारणार?

आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विजयपथावर परतण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत पंजाबला प्रामुख्याने विजयाची अधिक गरज आहे. कारण...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र X
Published on

रायपूर : आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विजयपथावर परतण्याच्या हेतूने मैदानात उतरतील. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत पंजाबला प्रामुख्याने विजयाची अधिक गरज आहे. कारण एकवेळ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या या संघाला सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे सोमवारी त्यांच्याकडे लक्ष असेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने १० पैकी ६ सामने जिंकले असून त्यांच्याकडे रद्द लढतीचा एक गुण असे मिळून एकूण १३ गुण आहेत. मात्र गेल्या तीन सामन्यांत पंजाब पराभूत झाली आहे. त्यामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत घसरला आहे. पंजाबने शेवटची लढत दिल्लीविरुद्धच २६५ धावांचा पाठलाग करून जिंकली होती. आता पुन्हा ते दिल्लीविरुद्धच विजयपथावर परतण्यास आतुर असतील. यासाठी प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग व श्रेयस यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. कूपर कोनोली, शशांक सिंग यांनाही चमक दाखवावी लागेल. गोलंदाजीत अर्शदीप सिंग व युझवेंद्र चहल यांच्यावर मदार असेल.

दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने ११ पैकी ४ लढती जिंकल्या असून त्यांचे आव्हान जर-तरवर शिल्लक आहे. धरमशाला येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक विजय मिळवले आहेत. तसेच येथे दव फारसे येत नसल्याने गोलंदाजांनाही सहाय्य लाभेल. मात्र दिल्लीकडून कुलदीप यादव, नटराजन यांनी निराशा केली आहे. मिचेल स्टार्क व लुंगी एन्गिडी यांच्यावर मदार असेल. फलंदाजीत राहुलकडून अपेक्षा आहेत. डेव्हिड मिलरला वगळणे संघाला महागात पडत आहे. नितीश राणा, समीर रिझवी यांनी निराशा केली आहे. अक्षरलासुद्धा अष्टपैलू चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे एकूणच दिल्ली संघर्ष करत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in