IPL 2026 : पंजाबचे पाचव्या विजयाचे ध्येय; अग्रस्थान कायम राखण्यासाठी सज्ज; संघर्ष करणाऱ्या लखनऊविरुद्ध लढत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी सायंकाळी होणाऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाब किंग्ज संघ विजयी पंच लगावण्यासाठी सज्ज आहे. मुल्लानपूर येथील महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्यांची लखनऊ सुपर जायंट्स संघाशी गाठ पडेल. लखनऊचा संघ सातत्याने संघर्ष करत असून ते विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक असतील.
IPL 2026 : पंजाबचे पाचव्या विजयाचे ध्येय; अग्रस्थान कायम राखण्यासाठी सज्ज; संघर्ष करणाऱ्या लखनऊविरुद्ध लढत
Published on

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी सायंकाळी होणाऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाब किंग्ज संघ विजयी पंच लगावण्यासाठी सज्ज आहे. मुल्लानपूर येथील महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्यांची लखनऊ सुपर जायंट्स संघाशी गाठ पडेल. लखनऊचा संघ सातत्याने संघर्ष करत असून ते विजयपथावर परतण्यासाठी उत्सुक असतील.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील. त्यामुळे स्पर्धेचा ज्वर हळूहळू वाढत आहे.

दरम्यान, मुंबईकर श्रेयसच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ सध्या भन्नाट फॉर्मात असून गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे. पंजाबने पाचपैकी चार सामने जिंकताना अनुक्रमे गुजरात, चेन्नई, हैदराबाद, मुंबई यांना धूळ चारली, तर त्यांचा कोलकाताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, शशांक सिंग, नेहल वधेरा असे अनकॅप्ड खेळाडू आणि कूपर कोनोली, मार्कस स्टोइनिस असे धडाकेबाज फलंदाज पंजाबकडे आहेत. श्रेयसची फलंदाजी व नेतृत्व या संघाची खरी ताकद आहे. तसेच अर्शदीप सिंगला सूर गवसला असून फक्त युझवेंद्र चहलने कामगिरीत सुधारणा करावी, अशी पंजाबला अपेक्षा असेल.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणारा लखनऊ संघ सातत्याने संघर्ष करत आहे. लखनऊने पाचमधून २ लढती जिंकल्या आहेत. मात्र गेल्या दोन लढतींमध्ये त्यांना गुजरात व बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला आहे. अशा स्थितीत ते पंजाबला कितपत झुंज देणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच पंत हाताच्या दुखापतीमुळे या लढतीसाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. मोहम्मद शमी, प्रिन्स यादव व फिरकीपटू दिग्वेश राठी यांमुळे लखनऊची गोलंदाजी बळकट असली, तरी फलंदाजीत मिचेल मार्श, निकोलस पूरन व एडीन मार्करम यांना अद्याप योगदान देता आलेले नाही. आयुष बदोनी व मुकूल चौधरी असे प्रतिभावान फलंदाज लखनऊकडे आहेत. मात्र पंतने कर्णधार व फलंदाज म्हणून सातत्य दाखवले, तरच लखनऊचा संघ विजयपथावर परतू शकतो.

उभय संघांत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यांपैकी पंजाबने ३, तर लखनऊनेदेखील ३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत अटीतटीची झुंज अपेक्षित आहे. आता कोणता संघ आघाडी घेणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

खेळपट्टीचा अंदाज

मुल्लानपूर येथे फलंदाजांना नेहमीच सहाय्य लाभले आहे. पंजाबने येथे धावांचा पाठलाग करून सहज विजय मिळवले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. लढतीवर पावसाचे सावट नसल्याने रंगतदार सामना अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्याश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, मणिमरन सिद्धार्थ, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.

logo
marathi.freepressjournal.in