

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता बुधवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात कडवा संघर्ष पाहायला मिळेल. पंजाबचा संघ अग्रस्थान टिकवण्याच्या, तर हैदराबाद अव्वल स्थान पटकावण्याच्या हेतून मैदानात उतरेल. दोन्ही संघांमध्ये बेधडक फलंदाजांचा भरणा असून दोन्ही संघ गेल्या सामन्यात पराभव पत्करून आले आहेत, त्यामुळे विजयपथावर परतण्यासाठी दोघेही उत्सुक असतील.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ तूर्तास ९ सामन्यांतील ६ विजय, १ रद्द लढत व २ पराभवाच्या एकूण १३ गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पंजाबला गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे राजस्थान व गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्यावरही दडपण वाढत आहे. मुख्य म्हणजे धावांचा पाठलाग करताना सहज जिंकणाऱ्या पंजाबला दोन्हीही पराभव प्रथम फलंदाजी करताना पत्करावे लागले आहेत. अशा स्थितीत पंजाबसाठी नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल.
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग या सलामीवीरांसह श्रेयसवर पंजाबची फलंदाजी अवलंबून आहे. शशांक सिंगच्या अनुपस्थितीत मुंबईकर सूर्यांश शेडगेने अर्धशतक झळकावले. मात्र कूपर कोनोली व मार्कस स्टोइनिस यांच्याकडून पंजाबला सातत्य अपेक्षित आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग व झेव्हियर बार्टलेट महागडे ठरत आहेत. फिरकीपटू युझवेंद्र चहलही संघर्ष करत आहे. त्यामुळे पंजाबला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. लॉकी फर्ग्युसनला खेळवण्याचा पर्याय पंजाबकडे उपलब्ध आहे. शशांकच्या तंदुरुस्तीबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने १० पैकी ६ लढती जिंकल्या असून १२ गुणांसह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सलग पाच विजय नोंदवल्यावर हैदराबादला गेल्या सामन्यात कोलकाताकडून पराभव पत्करावा लागला. आता घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना ते पुन्हा लय मिळवण्यास उत्सुक असतील. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा व इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांच्या त्रिकुटावर हैदराबादची भिस्त असेल. तसेच गोलंदाजीत इशान मलिंगा व साकिब हुसैन चमक दाखवत आहेत. मात्र कमिन्स महागडा ठरत आहे. फिरकीपटू शिवांग कुमार हुकमी एक्का ठरू शकतो.
हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्यास प्राधान्य देतो. मात्र बुधवारी लढतीवर पावसाचे सावट असल्याने नाणेफेक निर्णायक ठरू शकेल. पंजाबच्या संघाने नेहमीच धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बुधवारी वातावरणासह नाणेफेकीकडे सर्वांचे लक्ष असेल.
उभय संघांत आतापर्यंत २५ सामने झाले आहेत. त्यांपैकी हैदराबादने १७, तर पंजाबने ८ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी हैदराबादच्या बाजूने असली, तरी सध्या पंजाबचा संघ उत्तम लयीत आहे. त्यामुळे हैदराबाद त्यांना धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
खेळपट्टीचा अंदाज
खेळपट्टी क्रमांक दोनवर ही लढत होणार असून येथे यापूर्वी झालेल्या लढतीत हैदराबादने दिल्लीविरुद्ध २४२ धावा केल्या होत्या. मंगळवारी हैदराबादमध्ये पाऊस पडल्याने बुधवारीदेखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धावांचा पाठलाग करणे सोपे ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.