IPL 2026 : राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांचा कस

आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने येतील.
IPL 2026 : राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांचा कस
IPL 2026 : राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादच्या फलंदाजांचा कस
Published on

जयपूर : आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने येतील. दोन्ही संघ विजयपथावर असून दोघांकडेही प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. विशेषत: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत राजस्थानचे गोलंदाज विरुद्ध हैदराबादचे फलंदाज यांच्यातील द्वंद्वाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. आता प्रत्येक संघाचे ७ सामने झाल्यानंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होणार आहे. त्यामुळेच आयपीएलचा ज्वर हळूहळू वाढणार आहे.

दरम्यान, इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने सलग तीन सामने जिंकून अन्य संघांना इशारा दिला आहे. एकंदर हैदराबादने सातपैकी ४ सामने जिंकले असून तूर्तास ते अव्वल चार संघांत आहेत. अनुभवी पॅट कमिन्स या लढतीत परतण्याची शक्यता आहे. मात्र कमिन्सच्या अनुपस्थितीतही या संघातील गोलंदाजांनी छाप पाडली आहे. इशान मलिंगा, साकिब हुसैन, प्रफुल्ल हिंगे व दिलशान मदुशंका अशी वेगवान चौकडी त्यांच्याकडे आहे. तसेच फलंदाजीत शतकवीर अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन व ट्रेव्हिस हेड या विदेशी त्रिकुटासह किशन व नितीश रेड्डी चमक दाखवत आहेत.

दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने सातपैकी ५ सामने जिंकले आहेत. तेसुद्धा अव्वल ३ संघांत स्थान टिकवून आहेत. गेल्या लढतीत राजस्थानने १६० धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला. जोफ्रा आर्चर व नांद्रे बर्गर यांची वेगवान जोडी, रवी बिश्नोई व रवींद्र जडेजा असे फिरकीपटू त्यांच्या ताफ्यात आहेत. फलंदाजीत वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल यांच्यावर राजस्थानची मदार आहे. मात्र पराग, ध्रुव जुरेल व हेटमायर यांना कामगिरी उंचवावी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

सनरायजर्स हैदराबाद : इशान किशन (कर्णधार), पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, रविचंद्रन स्मरण, सलिल अरोरा, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश रेड्डी, शिवम मावी, क्रेन्स फुलेत्रा, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, शिवांग कुमार, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन, ओमकार तरमाळे, जयदेव उनादकट, झीशान अन्सारी, दिलशान मदुशंका, जेराल्ड कोएट्झे.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in