

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा संघ बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर त्यांची तळाच्या लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.
दरम्यान, बंगळुरूने बाद फेरीतील स्थान पक्के केले असून आता उर्वरित तीन स्थानांसाठी सात संघांत शर्यत सुरू आहे. रियान परागच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थानने १२ पैकी ६ लढती जिंकल्या असून ते १२ गुणांसह सहाव्या स्थानी आहेत. मात्र राजस्थानने सलग तीन लढती गमावल्याने त्यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानने शेवटचा सामना २८ एप्रिल रोजी जिंकला होता. म्हणजेच मे महिन्यात ते अद्याप विजयाची प्रतीक्षा करत आहेत. आता उर्वरित दोन लढतींमध्ये त्यांना लखनऊ आणि मुंबईला नमवणे अनिवार्य असेल.
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल व ध्रुव जुरेल या आघाडीच्या त्रिकुटावर राजस्थानची फलंदाजी अवलंबून आहे. परागनेदेखील गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले. मात्र त्यानंतर त्यांची फलंदाजी ढेपाळली. तसेच रवींद्र जडेजाला संघातून वगळणे राजस्थानला महागात पडले. जोफ्रा आर्चर फक्त लयीत दिसत आहे. रवी बिश्नोई व संदीप शर्मा यांना संधी मिळणे गरजेचे आहे. वैभव व यशस्वी यांनी पॉवरप्लेनंतर संयमाने फलंदाजी करणे गरजेचे आहे.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र गेल्या ३ पैकी २ लढतींमध्ये लखनऊने विजय मिळवला आहे. त्यांनी अनुक्रमे बंगळुरू व चेन्नई या संघांना धक्का दिला.
जोश इंग्लिस, मिचेल मार्श, निकोलस पूरन व एडीन मार्करम असे धडाकेबाज चार फलंदाज लखनऊच्या ताफ्यात आहेत. विशेषत: मार्शने ३ सामन्यांत १ शतक व एकदा ९० धावांची खेळी साकारली. पंतलाही सूर गवसला आहे. गोलंदाजीत प्रिन्स यादव लखनऊचा हुकमी एक्का आहे. फिरकी विभागात शाहबाज अहमद व दिग्वेश राठी यांच्यावर लखनऊची मदार आहे.
उभय संघांत आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यांपैकी राजस्थानने ५, तर लखनऊने २ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी राजस्थानच्या बाजूने असली, तरी लखनऊ स्पर्धेबाहेर गेल्याने ते बेधडक खेळत आहेत. त्यामुळे राजस्थानला सावध राहावे लागेल.
खेळपट्टीचा अंदाज
जयपूरमध्ये होणाऱ्या या लढतीत फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल. तसेच धावांचा पाठलाग करणे सोपे ठरू शकते. राजस्थानचा हा यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात अखेरचा सामना असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुंजा, युधवीर सिंग.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एडीन मार्करम, अब्दुल समद, आयुष बदोनी, मुकुल चौधरी, जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, मोहम्मद शमी, मोहसिन खान, आनरिच नॉर्किए, प्रिन्स यादव, मोहसिन खान, दिग्वेश राठी, अर्जुन तेंडुलकर, नमन तिवारी, मयांक यादव, जॉर्ज लिंडे.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप