IPL 2026 : अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला? धरमशाला येथे आज होणाऱ्या क्वालिफायर-१ लढतीत बंगळुरू आणि गुजरात यांच्यात द्वंद्व

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता बाद फेरीच्या टप्प्यावर आहे.
IPL 2026 : अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला? धरमशाला येथे आज होणाऱ्या क्वालिफायर-१ लढतीत बंगळुरू आणि गुजरात यांच्यात द्वंद्व
IPL 2026 : अंतिम फेरीचा पहिला मान कुणाला? धरमशाला येथे आज होणाऱ्या क्वालिफायर-१ लढतीत बंगळुरू आणि गुजरात यांच्यात द्वंद्व
Published on

धरमशाला : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम आता बाद फेरीच्या टप्प्यावर आहे. मंगळवार, २६ मे रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या क्वालिफायर-१ सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी सर्वप्रथम अंतिम फेरीचा मान कुणाला मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम आता निर्णायक वळणावर आहे. बंगळुरू, गुजरात, हैदराबाद व राजस्थान या संघांनी बाद फेरी गाठलेली असून अन्य सहा संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या नियमांनुसार साखळी फेरीच्या अखेरीस आघाडीच्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये ‘क्वालिफायर-१’चा मुकाबला रंगतो. या संघांना अंतिम फेरी गाठण्याची दोन वेळा संधी मिळते. ‘क्वालिफायर-१’ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत जातो, तर पराभूत झालेला संघ ‘क्लालिफायर-२’मध्ये खेळतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघांत ‘एलिमिनेटर’ लढत होते. यांच्यातील विजेता ‘क्वालिफायर-२’ साठी पात्र ठरतो. तर पराभूत संघ स्पर्धेबाहेर जातो.

आता बंगळुरू आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर-१ सामना होईल, तर २७ मे रोजी मुल्लानपूर येथे होणाऱ्या एलिमिनेटरमध्ये हैदराबादसमोर राजस्थानचे आव्हान असेल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल. यंदा एलिमिनेटर व क्वालिफायर-२ लढत एकाच स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे क्वालिफायर-१ गमावणाऱ्या संघाला अतिरिक्त प्रवास करावा लागेल. क्वालिफायर-२नंतर दोन दिवसांतच अंतिम सामना असल्याने खेळाडूंचा कस लागेल.

दरम्यान, रजत पाटीदारच्या नेतृत्वात बंगळुरूने यंदादेखील जेतेपदाच्या प्रबळ दावेदारासारखा खेळ करताना साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले. १४ सामन्यांतील ९ विजय व सर्वोत्तम नेटरनरेटच्या बळावर बंगळुरू आता सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यास आतुर असेल. बेधडक फलंदाजी आणि गोलंदाजीतील वैविध्य हीच बंगळुरूची ताकद असून तारांकित विराट कोहलीसारखा फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहे. त्याशिवाय देवदत्त पडिक्कल, पाटीदार व टिम डेव्हिड यांनीही चमक दाखवली आहे. फिल सॉल्ट या लढतीसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. जितेश शर्मा व रोमारिओ शेफर्ड यांच्या कामगिरीची मात्र बंगळुरूला नक्कीच चिंता असेल. बंगळुरूने काही दिवसांपूर्वीच धरमशाला येथे पंजाबला नमवले होते. त्यामुळे त्यांना येथील वातावरण व खेळपट्टीची पुरेशी जाण असेल.

दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातनेदेखील १४ पैकी ९ सामन्यांत विजय मिळवताना दुसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली. २०२२च्या विजेत्या गुजरातला यंदा दुसरे जेतेपद खुणावत असून यासाठी त्यांची सर्वाधिक भिस्त आघाडीच्या त्रिकुटावर असेल. गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे तिन्ही फलंदाज उत्तम लयीत आहेत. तसेच वॉशिंग्टन सुंदर व जेसन होल्डरही अष्टपैलू योगदान देत असल्यामुळे गुजरातचा संघ समतोल दिसत आहे. बंगळुरूप्रमाणेच वेगवान गोलंदाजी गुजरातची जमेची बाजू असून त्यांच्याविरुद्ध बंगळुरूचे फलंदाज कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

वेगवान गोलंदाज ठरवणार सामन्याचा निकाल

पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला बंगळुरूचा भुवनेश्वर कुमार (२४ बळी) आणि गुजरातचा कगिसो रबाडा (२४ बळी) या दोघांची कामगिरी सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरेल. भुवनेश्वरच्या साथीला बंगळुरूकडे अनुभवी जोश हेझलवूड आणि यंदा छाप पाडलेला रसिक सलाम यांची जोडी आहे. तर गुजरातकडून रबाडाच्या साथीने मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, अर्शद खान चमक दाखवत आहेत. फिरकी विभागात रशिद खानसारखा खेळाडू गुजरातकडे आहे, तर बंगळुरूची मदार कृणाल पंड्या व सूयश शर्मा या जोडीवर आहे. मात्र मंग‌ळवारी सूयशऐवजी जेकब डफीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

उभय संघांत आतापर्यंत ८ सामने झाले आहेत. त्यांपैकी बंगळुरूने ४, तर गुजरातनेदेखील ४ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. आता मंगळवारी या द्वंद्वात कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.

हे माहीत आहे का?

  • गुजरातचा संघ धरमशाला येथे प्रथमच आयपीएल सामना खेळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर नवे आव्हान असेल.

  • बाद फेरीत पोहोचलेल्या चारही संघांनी प्रत्येकी एकदा आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे. त्यांपैकी एक संघ यंदा दुसरे जेतेपद पटकावेल.

खेळपट्टीचा अंदाज

धरमशाला येथे यंदाच्या हंगामात सायंकाळच्या वेळी झालेल्या दोन्ही लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला होता. दव येथे निर्णायक भूमिका बजावत असल्याने २२० धावाही कमी पडू शकतात. लढतीवर पावसाचे सावट नसून येथे धीम्या गतीचे चेंडू प्रभावी ठरू शकतात.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, रिचर्ड ग्लीसन.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in