IPL 2026 : बंगळुरूचा थरारक विजय; मुंबईसह लखनऊचे पॅकअप

आयपीएलमध्ये रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर अखेरच्या चेंडूवर २ गडी राखून सरशी साधली.
IPL 2026 : बंगळुरूचा थरारक विजय; मुंबईसह लखनऊचे पॅकअप
IPL 2026 : बंगळुरूचा थरारक विजय; मुंबईसह लखनऊचे पॅकअप (Photo-X)
Published on

रायपूर : आयपीएलमध्ये रविवारी रात्रीपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर अखेरच्या चेंडूवर २ गडी राखून सरशी साधली. त्यामुळे बंगळुरूने अव्वल दोन संघांतील स्थान पक्के केले, तर मुंबईसह लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान संपुष्टात आले.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजीला आव्हानात्मक खेळपट्टीवर तिलक वर्मा (४२ चेंडूंत ५७) व नमन धीर (३२ चेंडूंत ४७) यांनी प्रतिकार केला. सूर्यकुमार यादव (०), रायन रिकल्टन (२), रोहित शर्मा (२२) यांनी निराशा केली. भुवनेश्वर कुमारने ४ बळी मिळवून छाप पाडली.

त्यानंतर मुंबईनेही बंगळुरूच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला. विशेषत: दीपक चहरने विराट कोहली (०) व देवदत्त पडिक्कल (१२) यांना स्वस्तात बाद केले. तर कॉर्बिन बोशने जेकब बेथल (२७), रजत पाटीदार (८), जितेश शर्मा (१८) व टिम डेव्हिड (०) यांना माघारी पाठवून रंगत निर्माण केली. कृणाल पंड्याने मात्र ४६ चेंडूंत ७३ धावांची जिगरबाज खेळी साकारून बंगळुरूच्या आशा कायम राखल्या. अल्लाह गझनफरने त्याला बाद केले.

मग अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना राज बावाने शेफर्डचा बळी मिळवला. मात्र त्यापूर्वी २ वाईड व १ नो-बॉल टाकला. अखेरीस ३ चेंडूंत ९ धावांची गरज असताना भुवनेश्वरने षटकार लगावला. तर शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना रसिक दरने दुहेरी धाव काढत बंगळुरूच्या थरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक क्षणी मुंबईने क्षेत्ररक्षणातही चुका केल्या.

त्यामुळेच सामन्यावर पकड असूनही मुंबईच्या पदरी निराशा पडली व आता त्यांचे पॅकअप झाले. एकीकडे ११ सामन्यांतील सातव्या विजयासह बंगळुरूने बाद फेरीच्या दिशेने पाऊल टाकले. मुंबईचे ११ सामन्यांत ३ विजय, ८ पराभव असल्याने ६ गुणांसह त्यांचे आव्हान संपुष्टात आले. लखनऊचीसुद्धा तशीच स्थिती आहे. आता उर्वरित ८ संघांत बाद फेरीच्या चार स्थानांसाठी चुरस पाहायला मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in