

बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर लढत होणार आहे. फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे दोन्ही संघांना आता त्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. बंगळुरूचा संघ सध्या तिसऱ्या स्थानी असून अव्वल चार जणांमध्ये स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे क्रमप्राप्त आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नव्हती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरूचा ६ विकेट्स शिल्लाक राखून धुव्वा उडवला होता. घरच्या मैदानावरील बंगळुरूचा हा यंदाच्या मोसमातील पहिला पराभव ठरला होता. बंगळुरूचा संघ सध्या ८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून सनरायझर्स हैदराबाद (८ गुण), दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (प्रत्येकी ६ गुण) त्यांच्यापाठोपाठ आहेत.
माजी विजेत्या गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून ९९ धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे त्यांच्या निव्वळ धावगतीला (नेट रनरेट) मोठा फटका बसला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी सातत्य दाखवले असले तरी बी. साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स आणि राहुल तेवतिया यांना अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गुजरातकडे प्रसिद्ध कृष्णा, कॅगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि रशिद खान अशी तगडी गोलंदाजी असली तरी फलंदाजीतील अनिश्चिततेमुळे त्यांना अडचणी येत आहेत.
दुसरीकडे, बंगळुरूचा संघ घरच्या मैदानावरील या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून चाहत्यांचा निरोप घेण्यास प्रयत्नशील असेल. यानंतर बंगळुरूला रायपूरसह इतर ठिकाणी बाहेरचे सामने खेळायचे आहेत. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीने मागील सामन्यात झुंज दिली होती, मात्र फलंदाजांनी पुरेशा धावा न केल्याने त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात फिल सॉल्ट, कर्णधार रजत पाटिदार आणि टिम डेव्हिड यांसारख्या आक्रमक फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. दोन्ही संघांसाठी गुणतालिकेतील स्थान टिकवण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरातला केवळ विजयच नाही, तर आपला नेट रन रेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. गुजरात टायटन्ससाठी यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा प्रवास चढउतारांचा राहिला आहे. सलामीवीर आणि कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाने चमकदार कामगिरी केली असली तरी, सातत्याचा अभाव ही त्यांच्यासाठी मुख्य समस्या ठरत आहे.
गुजरातने आतापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी ३ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ३ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या ते ६ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ धावेने तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ५ गडी राखून थरारक विजय मिळवले आहेत. मुंबईविरुद्धच्या गेल्या सामन्यात साई सुदर्शन (०), जोस बटलर (५) आणि शुभमन गिल (१४) स्वस्तात बाद झाल्यावर गुजरातची मधली फळी कोलमडली होती. राहुल तेवतिया, शाहरूख खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही.
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये सहा सामने झाले असून त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे १०४ सामने खेळवण्यात आले असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४४ लढती जिंकल्या आहेत. दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ५६ सामन्यांत विजयी ठरला आहे.
चिन्नास्वामी खेळपट्टीवर फलंदाजांचेच वर्चस्व?
बंगळुरू येथील प्रतिष्ठित एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते आणि या मैदानावर फलंदाजांचेच मोठे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मैदानाची सीमारेषा जवळ असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हे मैदान गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. चालू हंगामात आतापर्यंत या मैदानावर चार सामने झाले असून, हे सर्व सामने अत्यंत रोमहर्षक आणि मोठ्या धावसंख्येचे झाले आहेत. फलंदाजांना पोषक ठरणारी ही खेळपट्टी आणि लहान मैदान यामुळे आगामी सामन्यांमध्येही धावांचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया, कॉनर इस्टरहुझैन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा, यश दयाल.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप