

धर्मशाळा (पीटीआय) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात कमालीचा संयम राखत पंजाब किंग्जचा २३ धावांनी पराभव केला. या अष्टपैलू कामगिरीसह यंदाच्या आयपीएल हंगामात प्ले-ऑफची फेरी गाठणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे.
बंगळुरूने दिलेल्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा डाव ८ बाद १९९ धावांवर आटोपला. पंजाबकडून शशांक सिंगने २७ चेंडूत ५६ धावांची जोरदार झुंज दिली, परंतु संघाला सलग सहाव्या पराभवापासून तो वाचवू शकला नाही.
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला. व्यंकटेश अय्यरने ४० चेंडूत ७३ धावांची नाबाद आणि वादळी खेळी केली. त्याला विराट कोहलीने ३७ चेंडूत ५८ धावा, देवदत्त पडिक्कलने २५ चेंडूत ४५ धावा आणि टिम डेव्हिडने १२ चेंडूत २८ धावांचे योगदान देऊन चांगली साथ दिली. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोहली आणि पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करून बंगळुरूला मजबूत स्थितीत आणले. कोहलीने ३१ चेंडूत ६७ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले, तर व्यंकटेशने मध्यंतराच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत छाप पाडली.