मुंबई : लॉर्ड शार्दूल, पालघर एक्स्प्रेस अशा विविध नावांनी लोकप्रिय असलेला मध्यमगती गोलंदाज, उपयुक्त अष्टपैलू व मुंबईकर शार्दूल ठाकूर आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षीही एप्रिल व मे महिन्यात आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यापूर्वी डिसेंबरमध्ये खेळाडूंचे मिनी ऑक्शन म्हणजेच लिलावप्रक्रिया होणार आहे. त्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना आपालल्या चमूत कायम राखलेल्या खेळाडूंची यादी (रिटेन) जाहीर करायची आहे. तसेच ट्रेड विंडो म्हणजेच खेळाडूंची अदलाबदल करण्याची किंवा खेळाडू ज्या किमतीला गेल्या हंगामात विकला गेला, तेवढी रक्कम समोरील संघाला देण्याची मुभाही सध्या आहे. त्याचाच लाभ घेत मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सकडून २ कोटी रुपयांत शार्दूलचा करार केला. त्यामुळे मुंबईचा संघ लखनऊला २ कोटी रुपये देणार आहे. शार्दूलने गेल्या हंगामात १० सामन्यांत १३ बळी मिळवले. तसेच वानखेडेवर तो उपयुक्त फटकेबाजी करू शकतो.
शार्दूल हा मूळचा मुंबईकर आहे. तो सध्या मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधारही आहे. पालघर ते मुंबई असा एकेकाळी दररोज शार्दूल प्रवास करायचा. मात्र आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची कधीच संधी लाभली नव्हती. यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्ज, पुणे सुपरजायंट्स, लखनऊ, कोलकाता व दिल्ली कॅपिटल्स अशा विविध संघांचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी २०१७मध्येही शार्दूलला पुण्याकडून पंजाबने, तर २०२३मध्ये दिल्लीकडून कोलकाताने पैशांच्या स्वरूपातच खरेदी केले होते.
शार्दूलव्यतिरिक्त, मुंबईने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज शर्फेन रुदरफोर्डलाही संघात सहभागी केले. रुदरफोर्ड गेल्या हंगामात गुजरातचा भाग होता. त्याला २.४ कोटी रुपयांत मुंबईने खरेदी केले आहे. याबदल्यात मुंबई गुजरातला पैसेच देणार आहे. त्यामुळे दोन खेळाडू मुंबईने कोणत्याही खेळाडूची अदलाबदल न करता घेतलेले आहेत.
दरम्यान, संजू सॅमसन व रवींद्र जडेजा यांच्या संघबदलाची हवा असताना मुंबईने मात्र शांतपणे आपल्याला हवे ते खेळाडू घेतलेले आहेत. त्यामुळे मुंबई आता कोणत्या खेळाडूंना सोडणार, हे पाहणेही रंजक ठरेल. ९.५ कोटी रुपयांना विकत घेतलेल्या दीपक चहरला मुंबईचा संघ सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
३१ वर्षीय सॅमसन राजस्थान रॉयल्सला सोडून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्यास राजी असल्याचे समजते. त्या बदल्यात चेन्नईचा संघ राजस्थानला ३६ वर्षीय अष्टपैलू जडेजासह इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनदेखील देण्यास तयार आहे. पुढील महिन्यात आयपीएलसाठी खेळाडूंचे ऑक्शन होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना खेळाडूंची आपापसात अदलाबदल करण्यासह संघात कायम राखण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची मुदत आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना मुभा
आयपीएलच्या लिलावापूर्वी सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे कायम राखलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. यंदा फक्त मिनी ऑक्शन असल्याने सर्व संघ कितीही खेळाडू आपल्याकडे कायम राखू शकतात. ते जितके खेळाडू सोडतील, तितकी रक्कम त्यांच्याकडे लिलावासाठी जमा होईल. त्यामुळे गतवर्षी गुणतालिकेत तळाशी राहिलेले संघ अधिकाधिक खेळाडूंना लिलावात उतरवून नव्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी उत्सुक असतील.