

लखनऊ : कर्णधार श्रेयस अय्यरने शनिवारी रात्री शानदार शतकी खेळी साकारली. त्याने ५१ चेंडूंत नाबाद १०१ धावा फटकाविल्या. त्यामुळे पंजाब किंग्जने पराभवाची कोंडी फोडली आणि लखनऊ सुपर जायंट्सला ७ गडी आणि १२ चेंडू राखून नमवले. मात्र या विजयानंतरही पंजाबचे आव्हान संपुष्टात आले.
पंजाबचे १४ सामन्यांत १५ गुण झाले, तर राजस्थानने मुंबईला नमवून १६ गुणांवर मजल मारली. त्यामुळे त्यांनी आगेकूच केली. पंजाबसह कोलकाता संघाचेही आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे दिल्ली विरुद्ध कोलकाता ही अखेरची साखळी लढत निरर्थक ठरली. पंजाबचा सध्याचा कर्णधार श्रेयस अय्यर हा २०२४ मध्ये कोलकाताचा कर्णधार होता. त्यावेळी कोलकाताने आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र अंतर्गत वादामुळे कोलकाताने श्रेयसला संघात कायम राखले नाही.
यंदा सुरुवातीच्या सात सामन्यांनंतर (२५ एप्रिल रोजी) पंजाबचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी होता. त्यांनी ७ पैकी ६ लढती जिंकल्या होत्या. त्याचवेळी कोलकाता ३ गुणांसह गुणतालिकेत १०व्या स्थानी होता. कोलकाता-पंजाब यांच्यातीलच लढत पावसामुळे रद्द झाली होती. हाच १ गुण पंजाबला अखेरीस महागात पडला. पंजाबला सलग सहा पराभवांना सामोरे जावे लागले. इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, की एखादा संघ सुरुवातीला ७ पैकी ६ सामने जिंकूनही बाद फेरी गाठू शकला नाही. दुसरीकडे कोलकाताने देखील दुसऱ्या टप्प्यात चमक दाखवली होती. मात्र त्यांना नशिबाची साथ लाभली नाही. अखेरीस कोलकाता संघही साखळी फेरीत गारद झाला.
दरम्यान, २६ मे रोजी धरमशाला येथे क्वालिफायर-१ सामना होईल. २७ मे रोजी मुल्लानपूर येथे एलिमिनेटर लढत होईल. २९ मे रोजी मुल्लानपूरलाच क्वालिफायर-२ सामना होईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महाअंतिम मुकाबला रंगेल.
सचिनकडून अर्जुनच्या कामगिरीचे कौतुक; समाज माध्यमांवर एकच चर्चा
लखनऊ : २६ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला शनिवारी रात्री यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊकडून प्रथमच खेळण्याची संधी लाभली. त्याने ४ षटकांत ३६ धावा देताना टिच्चून मारा केला. प्रभसिमरन सिंगचा यॉर्करवर बळीही मिळवला. अर्जुनच्या गोलंदाजीवर एक झेलही सुटला गेला. या कामगिरीनंतर अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकरने केलेली ट्वीट व्हायरल होत आहे.
“वेल डन अर्जुन. यंदाच्या हंगामात तू दाखवलेला संयम, स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास आणि शांतपणे केलेले कठोर परिश्रम या बाबींमुळे तुझा अभिमान वाटतो. शेवटच्या सामन्यापर्यंत संधी मिळण्याची वाट पाहावी लागली असली, तरीही तू संपूर्ण काळात स्वतःला सकारात्मक ठेवले. क्रिकेट हा खेळ जितका कौशल्याचा आहे, तितकीच तो खेळाडूच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. या दोन्ही पातळ्यांवर तू उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. तुला शुभेच्छा आणि भरपूर प्रेम,” अशा शब्दांत सचिनने कौतुक केले.
वडिलांकडून आपले कौतुक होणे, यापेक्षा एका मुलासाठी मोठी गोष्ट काय असू शकते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत. आडनावाचे दडपण न बाळगता तो आणखी चमक दाखवेल व भविष्यात त्याला आयपीएलमध्ये आणखी संधी मिळतील, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.
बेथल माघारी
बंगळुरूचा सलामीवीर जेकब बेथल दुखापतीमुळे मायदेशी परतला असून तो बादफेरीच्या लढतींसाठी अनुपलब्ध असेल, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्पष्ट केले. बेथलच्या अनुपस्थितीचा फारसा फटका बंगळुरूला पडणार नाही, कारण फिल सॉल्ट तंदुरुस्त झाला आहे. वेंकटेश अय्यर लयीत आहे.
लोमरोर, रुचित मुंबईत
मुंबई इंडियन्सने डीकॉक व राज बावा यांच्या जागी महिपाल लोमरोर व रुचित अहिर या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. लोमरोर आयपीएलमध्ये यापूर्वी खेळलेला आहे, तर रुचित हा सौराष्ट्रचा २५ वर्षीय खेळाडू आहे. पुढील हंगामातही हे खेळाडू मुंबईकडे कायम राहतील, असे समजते.