IPL 2026 : तिलकचे अर्शदीपला प्रत्युत्तर; पंजाबचा सलग पाचवा पराभव

आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला ६ गडी व १ चेंडू राखून पराभूत केले. या लढतीत तिलक वर्माने ३३ चेंडूंत नाबाद ७५ धावांची शानदार खेळी साकारून पंजाब संघातील गोलंदाज अर्शदीप सिंगला चोख प्रत्युत्तर दिले.
IPL 2026 : तिलकचे अर्शदीपला प्रत्युत्तर; पंजाबचा सलग पाचवा पराभव
IPL 2026 : तिलकचे अर्शदीपला प्रत्युत्तर; पंजाबचा सलग पाचवा पराभव
Published on

धरमशाला : आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला ६ गडी व १ चेंडू राखून पराभूत केले. या लढतीत तिलक वर्माने ३३ चेंडूंत नाबाद ७५ धावांची शानदार खेळी साकारून पंजाब संघातील गोलंदाज अर्शदीप सिंगला चोख प्रत्युत्तर दिले. पंजाबचा हा सलग पाचवा पराभव ठरल्याने त्यांच्यापुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.

धरमशाला येथे ही लढत झाली. मात्र लढतीपूर्वी सकाळी अर्शदीपने स्नॅपचॅटवर एक व्हिडीओ पोस्ट केली होती. त्यामध्ये तो तिलकला वर्णावरून डिवचताना आढळला. दोघांमध्ये चांगली मैत्री असली, तरी तिलक मात्र काहीसा अर्शदीपच्या टिपणीने नाराज दिलसा. तिलकने त्या व्हिडीओत प्रत्युत्तरात काहीही म्हटले नाही. मात्र यावरून अनेकांनी अर्शदीपवर निशाणा साधला. त्यानंतर मैदानात तिलकने आपल्या बॅटद्वारे पंजाबसह अर्शदीपला प्रत्युत्तर दिले.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ८ बाद २०० धावांपर्यंत मजल मारली. प्रभसिमरन सिंग (३२ चेंडूंत ५७) व प्रियांश आर्य (२२) यांनी दमदार सुरुवात केली. मात्र शार्दूल ठाकूरने कर्णधार श्रेयस अय्यर (४), प्रभसिमरन, सूर्यांश शेडगे (८) यांना बाद करून पंजाबला रोखले. अखेरच्या ३ षटकांत पंजाबने ५० धावा चोपल्या. अझमतुल्ला ओमरझाईने १७ चेंडूंत ३८ धावा केल्या. मुंबईसाठी शार्दूलने चार, तर दीपक चहरने २ बळी मिळवले. जसप्रीत बुमराने या लढतीत मुंबईचे नेतृत्व केले.

त्यानंतर मुंबईने अडखळत्या सुरुवातीनंतरही १९.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रायन रिकल्टनने २३ चेंडूंत ४८ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने ६१ धावांची सलामी नोंदवली. मात्र रोहित शर्मा (२५), नमन धीर (९) संघर्ष करून बाद झाले. अखेरीस तिलकने ६ चौकार व ६ षटकारांसह मुंबईचा विजय साकारला. १८ चेंडूंत ५० धावांची गरज असताना विल जॅक्सने (नाबाद २५) त्याला सुरेख साथ दिली. मुंबईचा हा १२ सामन्यांतील चौथा विजय ठरला. मात्र त्यांचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

पंजाबला मात्र आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती जिंकणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या सातपैकी सहा सामने जिंकणाऱ्या पंजाबला त्यानंतर पाच पराभव पत्करावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in