CSK आणि SRH मध्ये IPL लिलावापूर्वी चार खेळाडूंची अदलाबदल; हार्दिक पांड्याच्या ट्रेडचीही जोरदार चर्चा

आयपीएल २०२७च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी चार खेळाडूंच्या ट्रेडवर (अदलाबदली) शिक्कामोर्तब केले आहे.
CSK आणि SRH मध्ये IPL लिलावापूर्वी चार खेळाडूंची अदलाबदल; हार्दिक पांड्याच्या ट्रेडचीही जोरदार चर्चा
CSK आणि SRH मध्ये IPL लिलावापूर्वी चार खेळाडूंची अदलाबदल; हार्दिक पांड्याच्या ट्रेडचीही जोरदार चर्चाआयपीएल २०२७च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी चार खेळाडूंच्या ट्रेडवर (अदलाबदली) शिक्कामोर्तब केले आहे.
Published on: 

नवी दिल्ली : आयपीएल २०२७च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी चार खेळाडूंच्या ट्रेडवर (अदलाबदली) शिक्कामोर्तब केले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जॅक एडवर्ड्स चेन्नईच्या संघात दाखल झाले आहेत. तर डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हैदराबादच्या संघात दाखल झाले आहेत. आयपीएलकडून गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज आणि अष्टपैलू लिव्हिंगस्टोनला चेन्नईने ६ कोटी रुपयांच्या सुधारित किमतीत आपल्या संघात घेतले आहे. यापूर्वी हैदराबादने त्याला १३ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू एडवर्ड्स हा त्याच्या आधीच्या ३ कोटी रुपयांच्या किमतीत चेन्नईत दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच हैदराबादने त्याला संघात घेतले होते. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे त्याला आयपीएल २०२६ मध्ये खेळता आले नव्हते.

या व्यवहारात हैदराबादने डावखुरा वेगवान गोलंदाज अहमदला ४.८ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात घेतले आहे. खलील यापूर्वी २०१८ ते २०२१ या कालावधीत हैदराबादकडून खेळला होता. चेन्नईकडून खेळताना आयपीएल २०२५ मध्ये त्याने १४ सामन्यांत १५ बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, आयपीएल २०२६ मध्ये पाच सामने खेळल्यानंतर उजव्या मांडीच्या स्नायूला (क्वाड्रिसेप्स) झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हादेखील २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत हैदराबादच्या संघात दाखल झाला आहे. डेथ ओव्हर्समध्ये अचूक गोलंदाजी आणि विविध प्रकारच्या चेंडूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या एलिसमुळे हैदराबादची वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत होणार आहे. आता आयपीएलच्या मिनी ऑक्शनची उत्सुकता आहे.

हार्दिकच्या ट्रेडची चर्चा

खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काही मोठ्या ट्रेडची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या संघ सोडून पंजाब किंग्जमध्ये दाखल होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्याच्या बदल्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १६ डिसेंबर रोजी गोवा येथे आयपीएलचे मिनी ऑक्शन होणार आहे.