हार्दिक पंड्या १८ कोटींना पंजाब किंग्जमध्ये; अर्शदीप सिंह मुंबई इंडियन्समध्ये दाखल, IPL मधील खेळाडूंच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि चर्चेतील खेळाडूंच्या अदलाबदलीत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्ज संघात दाखल झाला आहे.
हार्दिक पंड्या १८ कोटींना पंजाब किंग्जमध्ये; अर्शदीप सिंह मुंबई इंडियन्समध्ये दाखल, IPL मधील खेळाडूंच्या अदलाबदलीवर शिक्कामोर्तब
Published on: 

नवी दिल्ली : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि चर्चेतील खेळाडूंच्या अदलाबदलीत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्ज संघात दाखल झाला आहे. पंजाबने हार्दिकला १८ कोटी रुपयांच्या वाढीव मोबदल्यावर आपल्या संघात घेतले असून, त्याच्या बदल्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला मुंबई इंडियन्सकडे पाठवले आहे.

आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हार्दिकचा यापूर्वीचा मोबदला १६.३५ कोटी रुपये होता. दुसरीकडे, अर्शदीपची मुंबई इंडियन्सकडे बदली झाली असली, तरी त्याचा १८ कोटी रुपयांचा मोबदला कायम राहणार आहे.

यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने याच वर्षी राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला १८ कोटी रुपयांत संघात घेतले होते. त्याबदल्यात राजस्थानने चेन्नईकडून रवींद्र जडेजाला १४ कोटी रुपये आणि सॅम करनला २.४० कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले होते.

खेळाडूंच्या बदलीसाठी दिला जाणारा मोबदला (ट्रान्सफर फी) हा दोन फ्रँचायझींमधील परस्पर करारानुसार ठरतो. तो खेळाडूला मिळणाऱ्या प्रत्यक्ष कराराच्या रकमेपेक्षा (रिटेन्शन फी) स्वतंत्र असतो.

दोन्ही संघांनी परस्पर संमतीने हार्दिकच्या बदलीचा मोबदला १.६५ कोटी रुपयांनी वाढवण्याचे ठरवले. सध्याच्या नियमांनुसार या वाढीव रकमेपैकी ५० टक्के रक्कम हार्दिकला मिळणार असून उर्वरित रक्कम मुंबई इंडियन्सला मिळेल.

हार्दिकने २०२४ साली मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिकला चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. मुंबईत पुनरागमन केल्यानंतरच्या पहिल्या हंगामात मैदानावर त्याच्याविरुद्ध सातत्याने घोषणाबाजी झाली. दुसऱ्या हंगामात परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली; मात्र २०२६ च्या तिसऱ्या हंगामाच्या अखेरीस पुन्हा परिस्थिती बिघडली.

आगामी हंगामात रोहित पुन्हा मुंबईचे नेतृत्व करेल, अशी चर्चा आहे. तिलक वर्मा त्याचा उपकर्णधार आणि भविष्यातील उत्तराधिकारी असेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

अर्शदीप आठ हंगाम पंजाब किंग्जकडून खेळल्यानंतर आता मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने ९६ आयपीएल सामन्यांत १११ बळी मिळवले असून तो पंजाब किंग्जचा आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. २०२५ च्या आयपीएल हंगामात त्याने २१ बळी मिळवले होते, तर यंदाच्या हंगामात १४ बळी घेतले.

पंड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा - आकाश अंबानी

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी हार्दिकच्या योगदानाचा गौरव केला. “हार्दिकने मुंबई इंडियन्ससोबत अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून त्याची झालेली प्रगती, जागतिक स्तरावर त्याने निर्माण केलेली ओळख आणि त्यानंतर पुन्हा संघात परतून केलेले नेतृत्व आम्ही पाहिले आहे. हार्दिकचा क्रिकेटपटू म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही मला खूप आदर आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा,” असे आकाश अंबानी यांनी सांगितले.

हार्दिकच्या दुसऱ्या पर्वाची अखेर

या बदलीमुळे हार्दिकच्या मुंबई इंडियन्ससोबतच्या दुसऱ्या पर्वाचा अखेर झाला आहे. या संघाकडून खेळताना त्याने चार आयपीएल विजेतेपदे मिळवली होती. २०१५ मध्ये हार्दिक प्रथम मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. ३३ वर्षीय हार्दिकने २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या विजेतेपदाच्या हंगामांत फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबईकडून सात हंगाम खेळल्यानंतर २०२२ मध्ये तो १५ कोटी रुपयांच्या मोबदल्यावर गुजरात टायटन्समध्ये दाखल झाला. २०२४ मध्ये हार्दिक पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि अनुभवी रोहित शर्माकडून त्याने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, त्यानंतर संघाच्या कामगिरीत घसरण झाली. दुखापतींनी त्रस्त असलेल्या हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)