

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी आयपीएल २०२७ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. मंगळवारी त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड करण्यात आले. शमी नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
शमीला राजस्थान रॉयल्सने आठ कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. गेल्या वर्षी सनरायझर्स हैदराबादकडून त्याला १० कोटी रुपयांत लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले होते. मात्र, आता सुधारित आठ कोटी रुपयांच्या मोबदल्यात तो राजस्थानकडून खेळणार आहे.
आयपीएलने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुभवी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी आयपीएल २०२७ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून त्याला ट्रेड करण्यात आले आहे.
दरम्यान, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्थ यालाही लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड करण्यात आले आहे. त्यासाठी त्याला पूर्वीप्रमाणेच ७५ लाख रुपये मोबदला मिळेल.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला मात्र राजस्थानकडून लखनौ सुपर जायंट्समध्ये ट्रेड करण्यात आले आहे.
१३२ सामन्यांत १४५ विकेट्स
३६ वर्षीय शमीच्या समावेशामुळे राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी अधिक मजबूत होणार आहे. वेगवान गोलंदाजीतील कौशल्य आणि निर्णायक क्षणी बळी मिळवण्याची क्षमता यामुळे तो संघासाठी महत्त्वाचा ठरेल. शमीने आतापर्यंत आयपीएलमधील १३२ सामन्यांत १४५ बळी मिळवले आहेत.
हर्षल पटेल गुजरात टायटन्सकडून खेळणार
वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आगामी आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मंगळवारी त्याला सनरायझर्स हैदराबादकडून गुजरात टायटन्समध्ये चार कोटी रुपयांना ट्रेड करण्यात आले.