

मुंबई : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डूप्लेसिस यांनी रविवारी आयपीएलला अलविदा केला. रसेल हा कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करायचा. तर डूप्लेसिस गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला.
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी डिसेंबरमध्ये खेळाडूंची लिलावप्रक्रिया होणार आहे. त्यासाठी रसेल व डूप्लेसिसने नाव नोंदवलेले नाही.
रसेल हा २०१४ व २०२४च्या विजेत्या कोलकाता संघाचा भाग होता. त्याने ११ वर्षे कोलकाताचे प्रतिनिधित्व केले. मात्र कोलकाताने त्याला यावेळी संघात कायम राखले नाही. त्यामुळे रसेलने लिलावात उतरण्यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली. तसेच कोलकाताने त्याचा पॉवर कोच म्हणून नेमणूक केली आहे. म्हणजेच तो २०२६च्या आयपीएलमध्ये कोलकाताच्या फलंदाजांना ताकदीने षटकार कसे ठोकावे, याचे मार्गदर्शन करताना दिसेल.
दुसरीकडे डूप्लेसिस वयाच्या चाळीशीनंतरही आयपीएलमध्ये खेळत होता. चेन्नईला २०१२ व २०२१ची आयपीएल जिंकवून देण्यात डूप्लेसिसने मोलाची भूमिका बजावली होती.