जेद्दा : रविवारी भारताच्या फलंदाजांनी आयपीएलच्या लिलावावर वर्चस्व गाजवले होते. त्यानंतर सोमवारचा दिवस प्रामुख्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांनी गाजवला. सौदी अरेबियातील जेद्दा येथे झालेल्या आयपीएलच्या १८व्या हंगामासाठीच्या खेळाडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनुभवी भुवनेश्वर कुमारला १०.७५ कोटी रुपयांत करारबद्ध केले. तसेच पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने दीपक चहरला ९.२५ कोटी रुपयांत खरेदी केले.
भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत रविवारी आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाने पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याशिवाय श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५) यांच्यावर अनुक्रमे पंजाब किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स संघाने दमदार बोली लावली. सोमवारी मात्र प्रामुख्याने भारतासह जगभरातील गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले.
पुढील वर्षी मार्च ते मे महिन्यात आयपीएलचा १८वा हंगाम खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा सौदी अरेबिया येथे दोन दिवसांचे मेगा ऑक्शन आयोजित करण्यात आले होते. पंत, अय्यर, के. एल. राहुल असे आघाडीचे खेळाडू यंदा लिलावाच्या रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी संघमालक तुटून पडतील, याची सर्वांना कल्पना होती. त्यातच २०२२मध्ये अपघात झाल्यावर पंत जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. मात्र २०२४मध्ये त्याने झोकात पुनरागमन केले. त्यामुळे पंतसाठी संघमालक कोटींची उड्डाणे घेणार, हे निश्चित होते.
दरम्यान, गतवर्षी कोलकाताने मिचेल स्टार्कला २४ कोटींमध्ये विकत घेतले होते. श्रेयसने कोलकाताचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. मात्र त्याला संघात कायम राखण्यात आले नाही. अखेरीस पहिल्याच सेटमध्ये श्रेयसला प्रथम पंजाबने २६.७५ कोटींमध्ये खरेदी केले. मात्र श्रेयसचा हा विक्रम काही मिनिटांसाठीच राहिला. याच सेटमधील अखेरचा खेळाडू असलेल्या पंतवर लखनऊने २१ कोटींपर्यंत बोली लावली. त्यावेळी अन्य कोणीही आव्हान न दिल्याने मल्लिका सागर (लिलावकर्ती) हिने दिल्लीस पंतसाठी ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरायचे आहे का, हे विचारले. दिल्लीने होकार दिल्यावर लखनऊने थेट २७ कोटींवर पंतची किंमती नेली. मग दिल्लीने नकार दर्शवला व पंत लखनऊचा भाग झाला.
दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरसाठी मुंबई व बंगळुरूमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र बंगळुरूने यामध्ये बाजी मारली. त्यानंतर मुंबईने दीपकला संघात सहभागी केले. टिम डेव्हिड बंगळुरूकडे गेल्यावर मुंबईने बंगळूरूकडून गेल्या हंगामात खेळणाऱ्या विल जॅक्सला सहभागी केले.
लिलावाचा एकंदर विचार केल्यास चेन्नई, मुंबई या संघांनी पूर्ण रणनितीद्वारे खेळाडू खरेदी केले. पंजाबने अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक पैसे असल्याने कोटींच्या बोली लावल्या. बंगळुरूचे ७५ लाख लिलावाच्या अखेरीस शिल्लक राहिले. तर राजस्थान व हैदराबादने फक्त २० खेळाडू संघात घेतले. प्रत्येकाला २५ खेळाडूंपर्यंत संघ बनवण्याची मुभा होती.
सँटनर, गझनफर, जॅक्स मुंबई इंडियन्सच्या संघात
जेद्दा : लिलावाच्या पहिल्या दिवशी ट्रेंट बोल्टच्या रूपात दमदार वेगवान गोलंदाज घेणाऱ्या मुंबईने सोमवारीसुद्धा ठराविक खेळाडूंवरच बोली लावली. चहरला मुंबईने सर्वाधिक ९.२५ कोटी रुपये देत गोलंदाजी विभाग आणखी मजबूत केला. तसेच न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर, इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज विल जॅक्स व अफगाणिस्तानचा १८ वर्षीय जादुई फिरकीपटू अल्लाह गझनफार हे तिघे लक्षवेधी ठरले. गझनफरने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात छाप पाडली. त्याशिवाय मुंबईने रीस टॉप्ली, लिझाड विल्यम्स या गोलंदाजांवर बोली लावली.
मुंबई इंडियन्सचा संघ
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, अल्लाह गझनफर, मिचेल सँटनर, रायन रिकेलटन, रीस टॉप्ली, लिझाड विल्यम्स, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथुर, बेव्हन जेकब्स, एस. राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर.
यंदाच्या लिलावातील ५ महागडे खेळाडू
ऋषभ पंत : २७ कोटी (लखनऊ सुपर जायंट्स)
श्रेयस अय्यर : २६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
वेंकटेश अय्यर : २३.७५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
अर्शदीप सिंग : १८ कोटी (पंजाब किंग्ज)
युझवेंद्र चहल : १८ कोटी (पंजाब किंग्ज)