बंगळुरू : बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १८व्या हंगामाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. त्यास कारणही तसेच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी प्रत्येकी ६ खेळाडूंना संघात कायम राखण्याची मुभा दिली आहे. तसेच सर्व संघांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ही नावे जाहीर करणे अनिवार्य आहेत. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या अथवा चौथ्या आठवड्यात लिलाव होईल.
नेहमीप्रमाणे यंदाही १० संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. २००८पासून सुरू झालेल्या आयपीएलचे आतापर्यंत १७ पर्व दणक्यात पार पडले आहेत. गेल्या वर्षी कोलकाता नाइट रायडर्सने ही स्पर्धा जिंकली. त्यांचे ते तिसरे विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी सर्वाधिक ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या आयपीएलच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लिलावासंबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
कायम ठेवण्यात येणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये लिलावात एका राइट टू मॅच कार्डचा (आरटीएम) समावेश असेल. लिलावात संघांना १२० कोटी रुपये खर्च करता येतील, मात्र, ‘आरटीएम’ वापर करणाऱ्या खेळाडूची किंमत ७५ कोटी रुपये राहील असे बंधन घालण्यात आले आहे. अखेरच्या ‘आयपीएल’मध्ये संघांना केवळ चार खेळाडू कायम ठेवण्याची मुभा होती.
याचबरोबर ‘बीसीसीआय’चे सचिव यांनी लीगमधील सर्व साखळी लढती खेळणाऱ्या खेळाडूंना ७.५० लाख रुपये इतके सामना मानधन निश्चित करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे या खेळाडूंना अतिरिक्त १.०५ कोटी रुपयांचा फायदा मिळणार आहे. यामुळे आता संघांना लिलावातील १२० कोटी रुपयाच्या खर्चासह अतिरिक्त १२.६० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवावी लागेल.
कायम ठेवण्यात येणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंसाठी अनुक्रमे १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी रुपये संघ मालकांना राखून ठेवावे लागतील. यानंतर संघ मालकांनी आणखी दोन खेळाडूंची निवड केल्यास त्यांना पुन्हा अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे १२० कोटीतून ७५ कोटी गेल्यास उर्वरित ४५ कोटींमध्ये त्यांना १५ खेळाडू घ्यावे लागतील. ६ खेळाडूंमध्ये पाच कॅप्ड (आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले) खेळाडू असू शकतात. तसेच २ अनकॅप्ड खेळाडू (बिगरआंतरराष्ट्रीय) कायम राखल्यास ४ कॅप्ड खेळाडूंनाच संघात कायम राखता येईल. अनकॅप्ड खेळाडूची किंमत ४ कोटी असेल.
थोडक्यात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास सहावा खेळाडू त्यांना भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्यापैकी निवडावा लागेल. दरम्यान, शहा यांच्या घोषणेनुसार एक नवोदित भारतीय खेळाडू ‘आयपीएल’मध्ये तीन सामने खेळल्यास तो २० लाख रुपयांच्या पायाभूत किमतीसह २२.५ लाख रुपये अतिरिक्त कमवू शकतो. जर, त्या खेळाडूने हंगामात दहा रणजी करंडक सामने खेळले, तर त्याला २४ लाख रुपयेच मिळतील.
हे नियम महत्त्वाचे!
-कोणत्याही विदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनसाठी नोंदणी करावी लागेल. या मेगा ऑक्शनसाठी परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात तो नोंदणीसाठी अपात्र ठरेल.
-कोणताही खेळाडू जो लिलावासाठी नोंदणी करतो आणि लिलावात निवड झाल्यानंतर, हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध करतो, त्याला आता दोन हंगामांसाठी स्पर्धा आणि लिलावामध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल.
-कॅप्ड असलेला भारतीय खेळाडू अनकॅप्ड होईल, जर त्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२० आंतरराष्ट्रीय) मागील पाच कॅलेंडर वर्षांमध्ये ज्या वर्षात संबंधित हंगाम आयोजित केला आहे किंवा तो खेळला आहे. बीसीसीआयचा कोणताही केंद्रीय करार नाही. हे फक्त भारतीय खेळाडूंसाठी लागू असेल.
-इम्पॅक्ट प्लेयरचा नियम २०२५ ते २०२७ च्या हंगामापर्यंत कायम असणार आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
धोनी अनकॅप्ड प्लेयर म्हणून खेळणार?
भारताचा माजी क्रिकेटपटू आगामी आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेयर म्हणून खेळताना दिसू शकतो. नव्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला, तसेच पाच वर्षांपासून भारतासाठी एकही सामना न खेळलेला खेळाडू आता अनकॅप्ड म्हणून ओळखला जाईल. त्यानुसार धोनीला चेन्नईचा संघ सहाव्या क्रमांकाचा रिटेन खेळाडू म्हणून फक्त ४ कोटी देत संघात कायम राखू शकते. २०२१पर्यंत हा नियम होता. मात्र कोणीही त्याचा अवलंब केला नाही. यंदा पुन्हा हा नियम लागू करण्यात आल्याने एखादा संघ, याचा लाभ घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. फक्त भारतीय खेळाडूंसाठी हा नियम लागू असेल.
बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सिलन्स’
बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ‘सेंटर ऑफ एक्सिलन्स’ केंद्र रविवारपासून सुरू झाले. हे ठिकाण बंगळुरू विमानतळापासून जवळ असून येथे ३ विविध प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.