इम्पॅक्ट प्लेयर नियमावरून 'वादंग'! रोहित, विराटसह माजी क्रिकेटपटूंचा विरोध; अश्विन, शास्त्री यांचा मात्र पाठिंबा

आयपीएलचा १७वा हंगाम सुरू होऊन संपला तरी एका मुद्द्यावर सगळीकडे अद्यापही चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे या स्पर्धेतील इम्पॅक्ट प्लेयर हा नियम.
इम्पॅक्ट प्लेयर नियमावरून 'वादंग'! रोहित, विराटसह माजी क्रिकेटपटूंचा विरोध; अश्विन, शास्त्री यांचा मात्र पाठिंबा
छायाचित्र सौजन्य - एक्स @Cricket24_Game

ऋषिकेश बामणे/मुंबई

आयपीएलचा १७वा हंगाम सुरू होऊन संपला तरी एका मुद्द्यावर सगळीकडे अद्यापही चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे या स्पर्धेतील इम्पॅक्ट प्लेयर हा नियम. या नियमामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा २०० धावांचे लक्ष्य सहज साध्य झाले. तसेच गोलंदाजी करतानाही अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला. मात्र अष्टपैलूंच्या प्रगतीसाठी हा नियम घातक ठरत असल्याचे मत भारताच्या काही आजी माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. तर काहींनी मात्र पाठिंबाही दिला आहे.

२०२३पासून आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला. चेन्नईचा तुषार देशपांडे हा वेगवान गोलंदाज गुजरातविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मैदानावर उतरला. दोन हंगामानंतर आता या नियमांविषयी पुन्हा विचारविनिमय करण्याची वेळ आली आहे. तसेच यापुढील हंगामात व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या नियमाचा अवलंब करावा की नाही, यासंबंधीही परीक्षण केले पाहिजे. इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार एखादा संघ सामन्यातील कोणत्याही वेळी एखाद्या खेळाडूच्या जागेवर फलंदाज किंवा गोलंदाजाला मैदानात पाठवू शकतो. बदली करण्यात आलेला खेळाडू पुन्हा मैदानात परतू शकत नाही. मात्र इम्पॅक्ट प्लेयर बनून आलेला खेळाडू फलंदाजी अथवा गोलंदाजीही करू शकतो.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच तारांकित फलंदाज विराट कोहली मात्र या नियमाच्या विरोधात आहे. यामुळे भारतीय अष्टपैलूंची प्रगती होत नाही, असे त्यांचे मत आहे. त्याशिवाय शिवम दुबे, वेंकटेश अय्यर, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू फक्त फलंदाजीपुरता मर्यादित राहिले आहेत, असेही रोहित काही दिवसांपूर्वी म्हणाला. त्याउलट फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मात्र या नियमाला पाठिंबा दर्शवला आहे. काळानुसार बदलणे गरजेचे असून इम्पॅक्ट प्लेयर नियम नसला तरी फलंदाज आता याच मानसिकतेत खेळतील, असा मुद्दा त्यांनी मांडला.

याविषयी सगळीकडे रंगलेली चर्चा पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनाही भाष्य करण्यास भाग पाडले. इम्पॅक्ट प्लेयर हा नियम हा कायमस्वरूपी नसून टी-२० विश्वचषकानंतर बीसीसीआयचे पदाधिकारी व भारतीय संघ व्यवस्थापनासह या बाबतीत नक्कीच संवाद साधून निर्णय घेऊ, असे जय शहा म्हणाले.

तूर्तास २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून या स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम असल्याने संघ कशाप्रकारे खेळतात, हे पाहणे रंजक ठरेल.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे लपले जात आहेत. चाहत्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने हा नियम नक्कीच चांगला असेल, मात्र क्रिकेटच्या भवितव्यासाठी हा नियम मारक ठरेल. तसेच युवा पिढीने आयपीएलमधील यशापाठी न धावता कसोटी क्रिकेटचे महत्त्वही ओळखावे. - दिलीप वेंगसरकर, भारताचे माजी कर्णधार

क्रिकेट हा ११ खेळाडूंचा खेळ आहे. मात्र इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे १२ खेळाडू हा खेळ खेळत आहे. मी या नियमाच्या विरोधात असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या नियमाची गरज नाही. तसेच पुढील वर्षी आयपीएलमध्येही हा नियम नसावा, असे मला वाटते. - वासिम जाफर, माजी क्रिकेटपटू

चाहत्यांचे म्हणणे काय?

इम्पॅक्ट प्लेयर नियम हा चांगला आहे. यापुढेही तो असावा. क्रिकेट आता बदलत चालले असून टी-२०मध्ये या नियमाची आवश्यकता आहे. फक्त ७ ते १५ षटकांत या नियमाचा अवलंब करावा. - शुभम शेट्टी, चेन्नईचा चाहता

हा नियम क्रिकेटसाठी घातक ठरू शकतो. भारताकडे आधीच फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतके अष्टपैलू आहेत. या नियमाचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे हा नियम नसला तरच योग्य. - तनय गायकवाड, मुंबईचा चाहता

logo
marathi.freepressjournal.in