आयपीएल भारतातच खेळवणार; लीग अध्यक्ष अरुण धुमाळ यांची माहिती

लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात रंगणार आहेत.
आयपीएल भारतातच खेळवणार; लीग अध्यक्ष अरुण धुमाळ यांची माहिती

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा शनिवारी करण्यात आल्यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये खेळवण्यात येणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र या चर्चांना आयपीएल लीग अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी पूर्णविराम दिला असून यंदाची संपूर्ण आयपीएल भारतातच खेळवण्यात येणार, अशी माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात रंगणार आहेत. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव यंदाची आयपीएल यूएईमध्ये खेळवण्यात येणार, अशी चर्चा रंगली होती. यावर उत्तर देताना अरुण धुमाळ म्हणाले की, “आयपीएल कोणत्याही परिस्थितीत परदेशाबाहेर खेळवली जाणार नाही. आम्ही लवकरच आयपीएलचे पुढचे वेळापत्रक जाहीर करू.”

यंदाच्या आयपीएलचे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक याआधीच जाहीर करण्यात आले असून चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात २२ मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. २०१९मध्येही लोकसभा निवडणुकीचे वर्ष असतानाही आयपीएल भारतात खेळवण्यात आली होती, त्याचप्रमाणे यंदाची आयपीएलही आम्ही भारतात खेळवणार आहोत. आम्ही फक्त निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होण्याची वाट पाहत आहोत, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले होते. याआधी २०१४मध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात आली होती.

विशेष म्हणजे, २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार असल्यामुळे बीसीसीआयला त्याआधीच आयपीएल स्पर्धा संपवावी लागणार आहे. त्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक आखताना बीसीसीआयला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. समजा, भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात अडचणी आल्यास, बीसीसीआयसमोर यूएईचा पर्याय असू शकतो. त्यासाठी बीसीसीआयचे काही वरिष्ठ पदाधिकारी सध्या यूएईमध्ये असून तिथे आयपीएल खेळवण्याविषयी चाचपणी करत आहेत, असेही समजते. त्याचबरोबर आयपीएलमधील सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिल्याचेही समजते. २०२०मध्ये कोरोनाचे संकट असताना, आयपीएल स्पर्धा यूएईमधील दुबई, अबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी खेळवण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in