
क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात निर्णायक द्वंद्व रंगणार आहे. बाद फेरीतील तीन संघ ठरले असल्याने बुधवारी मुंबईने विजय मिळवल्यास त्यांचेही अव्वल चार संघांतील स्थान पक्के होईल. तर दिल्ली मात्र मुंबईला धक्का देत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र दोन्ही संघांच्या मार्गात पाऊस खलनायक ठरू शकतो. मुंबईत बुधवारी पावसाची दाट शक्यता असल्याने चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने १२ पैकी ७ लढती जिंकल्या असून तूर्तास ते १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. पहिल्या पाचपैकी फक्त एक लढत जिंकणाऱ्या मुंबईने दिल्लीविरुद्धच्या विजयापासून सलग विजयांचा षटकार लगावला होता. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी अखेरच्या लढतीत गुजरातने मुंबईला रोखले. मात्र आता पुन्हा दिल्लीविरुद्धच विजय मिळवून मुंबईला थाटात आगेकूच करण्याची संधी आहे.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीची अवस्था मुंबईच्या उलट आहे. पहिल्या पाचपैकी दिल्लीने चार लढती जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सात सामन्यांत त्यांना दोनच विजय मिळवता आले. त्यामुळे १३ गुणांसह दिल्ली पाचव्या स्थानी असून संघांतील खेळाडूंचा आत्मविश्वासही काहीसा खालावलेला दिसत आहे. गेल्या लढतीत २०० धावा करूनही दिल्लीला गुजरातकडून १० गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते मुंबईविरुद्ध लय मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, वानखेडेवर यंदाच्या हंगामातील ६ पैकी ४ सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. मुंबईने येथे मिळवलेले तीन विजय हे धावांचा पाठलाग करूनच आहे. मात्र पावसाची शक्यता असल्याने येथे दवाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. २०२४मध्ये वानखेडेवर मुंबईने दिल्लीला नमवले होते. तसेच मुंबईने पहिल्या टप्प्यातील लढतीतही दिल्लीला धूळ चारली होती. त्यामुळे दिल्ली त्या पराभवाची परतफेड करण्यास आतुर असेल. मात्र मुंबईविरुद्ध घरच्याच मैदानात ते करणे सोपे नसेल. एकूणच बुधवारची लढत रंगतदार होऊ शकते.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३६ सामन्यांपैकी मुंबईने २०, तर दिल्लीने १६ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार मुंबईचे पारडे जड असले, तरी दोन्ही संघांसाठी ही लढत निर्णायक असल्याने चाहत्यांना थरार पाहायला मिळू शकतो. पहिल्या टप्प्यातील सामन्यात मुंबईने दिल्लीला १२ धावांनी नमवले होते.
बेअरस्टो, ग्लीसन, असलंका मुंबईकडे
मुंबईच्या संघाने आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो, वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसन व श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंका यांची पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली आहे. दक्षिण आफ्रिका व इंग्लंडचे खेळाडू २६ मेपर्यंत त्यांच्या मायदेशी परततील. त्यामुळे मुंबईने बाद फेरी गाठली, तर रायन रिकल्टन, कॉर्बिन बोश व विल जॅक्स उपलब्ध नसतील. अशा स्थितीत या तीन खेळाडूंना संधी मिळू शकते. मात्र साखळी फेरीत हे खेळाडू खेळू शकणार नाहीत, हे महत्त्वाचे.
राहुलवर दिल्लीच्या आशा
दिल्ली संघाच्या आशा पुन्हा एकदा सलामीवीर के. एल. राहुलवर असतील. राहुलने गेल्या लढतीत शतक झळकावले. मात्र फॅफ डुप्लेसिस, अभिषेक पोरेल यांनी जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. तसेच मधळ्या फळीत ट्रिस्टन स्टब्स व आशुतोष शर्मा यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीत मिचेल स्टार्कची अनुपस्थिती दिल्लीला महागात पडली आहे. मुस्तफिझूर रहमान व फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यावर दिल्ली अवलंबून आहे. अक्षर गोलंदाजीत महागडा ठरत आहे. तसेच मुकेश कुमारही धावा रोखण्यात अपयशी ठरत आहे.
रोहित, बोल्टवर मुंबईची भिस्त
स्वत:च्या नावावर स्टँड बनल्यावर आता रोहित शर्मा वानखेडेवर पहिलीच लढत खेळणार आहे. तसेच कसोटीतून निवृत्ती पत्करल्यामुळे या लढतीत रोहितला मानवंदना देण्यासाठी चाहते पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करून येणार आहेत, असे समजते. रोहितशिवाय रायन रिकल्टन व सूर्यकुमार यादव यांच्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून आहे. हार्दिक व तिलक वर्मा यांच्याकडून मुंबईला फटकेबाजी अपेक्षित आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट व जसप्रीत बुमरा या वेगवान जोडीवर मुंबईची मदार आहे. विशेषत: बोल्ट वानखेडेवर पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात पटाईत आहे. फिरकीपटू मिचेल सँटनरही तंदुरुस्त आहे. दीपक चहरला मात्र डेथ ओव्हर्समधील कामगिरी सुधरावी लागणार आहे.
दोन तास अतिरिक्त वेळ
आयपीएलची प्रशासकीय समिती आणि बीसीसीआय यांनी आता उर्वरित साखळी सामन्यांसह बाद फेरीच्या लढतींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पावसामुळे सामना उशिराने सुरू झाला किंवा मध्येच थांबवण्यात आला, तरी २ तास म्हणजेच १२० मिनिटांपर्यंत सामना सुरू करण्याची परवानगी आहे. म्हणजेच रात्री १ वाजेपर्यंत सामना संपवण्याची मुभा आहे. मुंबई-गुजरात यांच्यातील सामनाही १२.३० वाजता अखेरच्या षटकासाठी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे गुजरातने ६ चेंडूंत १५ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश, रघू शर्मा, जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असलंका.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम, मुस्तफिझूर रहमान.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप