
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत मुल्लानपूरमध्ये धावांचा महापूर येण्याची दाट शक्यता आहे. महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्जची कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार आहे. दोन्ही संघांत धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. तसेच दोन मुंबईकर कर्णधारांमधील जुगलबंदीही या लढतीचे आकर्षण आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने पाचपैकी ३ सामने जिंकले आहेत. मात्र हैदराबादविरुद्ध गेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा करूनही पंजाबला पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीतून सावरत घरच्या मैदानात पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी पंजाबचा संघ उत्सुक असेल. पंजाबने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे गुजरात व लखनऊला नमवले. मात्र तिसऱ्या लढतीत राजस्थानने त्यांना रोखले. चेन्नईला नमवल्यावर मग पंजाबला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, मुल्लानपूर येथे आतापर्यंत झालेल्या यंदाच्या हंगामातील दोन्ही लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २००हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच दोन्ही वेळेस येथे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून २००हून अधिक धावसंख्या उभारण्यावर भर देईल.
दुसरीकडे मुंबईच्याच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने गेल्या सामन्यात चेन्नईचा अक्षरश: धुव्वा उडवला. सहापैकी ३ सामने जिंकणाऱ्या कोलकाताने क्रमानुसार एक सामना गमावल्यावर त्यापुढील लढतीत विजय मिळवला आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात त्यांनी दोन लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे मुल्लानपूर येथेही फलंदाजीचा क्रम आठव्या क्रमाकापर्यंत लांबलेला असल्याने कोलकाता धडाका करू शकते. तसेच पंजाबच्या तुलनेत त्यांची गोलंदाजी कागदावर अधिक बळकट आहे. एकंदर चाहत्यांना मंगळवारी रंगतदार लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पूर्वीच्या संघाविरुद्ध श्रेयसची बॅट तळपणार?
श्रेयस हा गतवर्षी कोलकाता संघाचा कर्णधार होता. त्याच्याच नेतृत्वात कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवले. मात्र आता श्रेयस पंजाबच्या ताफ्यात असून तो गतविजेत्या संघाविरुद्ध धावा ठोकण्यास आतुर असेल. श्रेयसने या हंगामात ५ सामन्यांत ३ अर्धशतकांसह २५० धावा केल्या आहेत. त्याशिवाय चेन्नईविरुद्धचा शतकवीर प्रियांश आर्य, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग व प्रभसिमरन सिंग यांच्यावर पंजाबची फलंदाजी अवलंबून आहे. ग्लेन मॅक्सवेलला मात्र अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तसेच गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे या लढतीला मुकू शकतो. अशा स्थितीत पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त अर्शदीप सिंग, मार्को यान्सेन व युझवेंद्र चहल यांच्यावर असेल.
नरिनला रोखण्याचे पंजाबपुढे आव्हान
कोलकातासाठी सातत्याने अष्टपैलू छाप पाडणारा सुनील नरिन यंदाही दमदार लयीत आहे. चेन्नईविरुद्ध ३ बळी घेण्यासह नरिनने १८ चेंडूंतच ४४ धावाही फटकावल्या. त्यामुळे पंजाबच्या दृष्टीने नरिनला रोखणे महत्त्वाचे असेल. गोलंदाजीत नरिनला वरुण चक्रवर्ती व मोईन अली या फिरकीपटूंची साथ लाभेल. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने हर्षित राणा व वैभव अरोरा यांचा कस लागेल. फलंदाजीत अजिंक्य, क्विंटन डीकॉक, वेंकटेश अय्यर, मुंबईकर अंक्रिश रुघुवंशी असे प्रतिभावान खेळाडू कोलकाताकडे आहेत. त्याशिवाय रिंकू सिंग, आंद्रे रसेल व रमणदीप सिंग असे बेधडक त्रिकुटही त्यांच्याकडे असल्याने कोलकातासमोर कोणतेही लक्ष्य छोटे वाटू शकते. सांघिक कामगिरीच्या बळावरच कोलकाताला नमवले जाऊ शकते.
आकडेवारी कोलकाताच्या बाजूने, पण...
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांपैकी कोलकाताने २१, तर पंजाबने १२ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारी कोलकाताच्या बाजूने असली तरी पंजाब यंदा पलटवार करण्यासाठी प्रयत्नशील असेल, यात शंका नाही.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप