संघमालकांची बैठक लांबणीवर; ‘रिटेन्शन’चा आकडा वाढणार

२०२५च्या आयपीएलपूर्वी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये लिलाव होईल. संघांच्या एकूण पैशांच्या रकमेत वाढ करण्यासह संघात नेमके किती खेळाडू कायम ठेवण्यात येतील, याविषयीसुद्धा या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
संघमालकांची बैठक लांबणीवर; ‘रिटेन्शन’चा आकडा वाढणार

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये समावेश असलेल्या १० संघांची १६ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे बैठक होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ही बैठक तूर्तास लांबणीवर पडली आहे. त्याशिवाय संघात कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आकडा (रिटेन्शन पॉलिसी) वाढवण्याबाबत जवळपास सर्व संघमालकांचे एकमत झाले आहे, असे समजते.

पुढील वर्षी होणारे मेगा ऑक्शन तसेच रिटेन्शन पॉलिसीसह असंख्य मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. दर तीन वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा ऑक्शन (खेळाडूंची लिलाव प्रक्रिया) होते. यापूर्वी २०२२च्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन झाले होते. आता २०२५च्या आयपीएलपूर्वी नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये लिलाव होईल. संघांच्या एकूण पैशांच्या रकमेत वाढ करण्यासह संघात नेमके किती खेळाडू कायम ठेवण्यात येतील, याविषयीसुद्धा या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

नियमाप्रमाणे मेगा ऑक्शनपूर्वी एका संघाला ४ खेळाडूच संघात कायम ठेवता येतात. मात्र यंदा एका संघाला ८ खेळाडू कायम ठेवण्याची मुभा मिळू शकते. यामध्ये २ ते ३ जागा विदेशी खेळाडूंसाठी राखीव असतील. त्याशिवाय प्रत्येक संघाला लिलावासाठी १०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे खेळाडूंवर आणखी मोठी बोली लागण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा तसेच आयपीएलचे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ या बैठकीसाठी उपस्थित असतील. मात्र तूर्तास ही बैठक एका आठवड्यांने लांबू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in