
धरमशाला : भारत सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) गुरुवारी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील आयपीएल सामना आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारत-पाकमधील तणाव वाढला असल्याने या सामन्याचे ठिकाण बदलले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धरमशाला येथील विमानतळ सध्या बंद करण्यात आली आहेत. तसेच या लढतीसाठी अतिरिक्त सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. आजच्या पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामन्याच्या ठिकाणात बदल झाला नसला तरी ११ मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा सामना धर्मशाला येथून मुंबईला हलवण्यात आला आहे आणि सामन्याची नवीन तारीख लवकरच अपडेट केली जाईल. "बीसीसीआयला आजचा सामना धर्मशाला येथे आयोजित करण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे, परंतु ११ मे रोजी होणारा सामना धर्मशाला येथून मुंबईत हलवण्यात आला आहे, सामन्याची नवीन तारीख लवकरच अपडेट केली जाईल," असे बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले.
दरम्यान, आयपीएलचा १८वा हंगाम आता बाद फेरीच्या जवळ असल्याने पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील लढत फारच निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. बीसीसीआय तसेच आयपीएलच्या प्रशासकीय समितीने ठरलेल्या नियोजनानुसारच स्पर्धा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने सभोवताली उंच पर्वत असलेल्या धरमशाला येथील थंड वातावरणात दोन्ही संघांचा कस लागेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ सध्या उत्तम लयीत असून त्यांनी सल दोन लढती जिंकल्या आहेत. ११ सामन्यांतील ७ विजय व १ रद्द लढत अशा एकूण १५ गुणांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे दिल्लीला नमवून बाद फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याची पंजाबला संधी आहे.
दुसरीकडे अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ ऐन वेळी लय गमावत आहे. सुरुवातीला सलग चार सामने जिंकणाऱ्या दिल्लीने त्यांनतरच्या सात पैकी फक्त दोनच लढती जिंकल्या आहेत. ११ सामन्यांतील ६ विजय व १ रद्द लढत अशा १३ गुणांसह दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप