अग्रस्थान गाठण्याचे पंजाबचे लक्ष्य; दिल्ली कॅपिटल्सला नमवण्याचे आव्हान

दशकभराच्या निराशाजनक कामगिरीनंतर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जने चांगली कामगिरी केली आहे. शनिवारी हा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. पंजाबने ‘प्ले ऑफ’मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. परंतु या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष्य पंजाबचे असेल. तसेच अव्वल २ संघांत स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे.
अग्रस्थान गाठण्याचे पंजाबचे लक्ष्य; दिल्ली कॅपिटल्सला नमवण्याचे आव्हान
Published on

जयपूर : दशकभराच्या निराशाजनक कामगिरीनंतर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जने चांगली कामगिरी केली आहे. शनिवारी हा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. पंजाबने ‘प्ले ऑफ’मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. परंतु या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष्य पंजाबचे असेल. तसेच अव्वल २ संघांत स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. या सामन्यात विजय पंजाब किंग्जला अव्वल २ संघांत स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

२०१४ च्या हंगामात पंजाबने उपविजेतेपद पटकावले होते. गेल्या १८ हंगामात या संघाने केवळ एकदाच ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या ११ वर्षांतील निराशाजनक कामगिरी विसरून पंजाबने यंदा शानदार खेळ केला आहे. आता या संघाचे लक्ष्य केवळ अव्वल २ संघांत राहण्याचेच नसून आयपीएलचे पहिलेवहिले विजेतेपद पटकविण्याचे आहे.

४ परदेशी खेळाडूंचा भरणा असलेला संघ चांगलाच फॉर्मात आहे. मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिश, आरोन हार्डी आणि कायले जेमिसन हे खेळाडू तीन दिवसांपूर्वी संघात सहभागी झाले आहेत. भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धमय स्थितीमुळे ही स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित केली होती. त्यामुळे परदेशी खेळाडू मायदेशी परतले होते. मात्र आता ते परतले आहेत.

प्रभसिमरन सिंग (४५८ धावा), प्रियांश आर्य (३५६ धावा), अर्शदीप सिंग (११ विकेट) आणि युजवेंद्र चहल (१३ विकेट) यांनी पंजाबसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पंजाबने १२ सामन्यांत १७ गुण मिळवले असून ‘प्ले ऑफ’मधील आपले स्थान निश्चित केले आहे.

दुसरीकडे, मोठ्या धावांची कमतरता आणि शेवटी प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्सला ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. दरम्यान, आता हंगामाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दिल्लीचा असेल. परंतु पंजाबसारख्या फॉर्मात असलेल्या संघाविरुद्ध हे सहज शक्य असेल असे वाटत नाही. दरम्यान गटातील सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. प्ले ऑफमधील संघ निश्चित झाले असले तरी गटातील या अखेरच्या लढतींमधून टॉप-२ मध्ये प्रवेशासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. त्याकरिता गुजरात टायटन्स, बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये चढाओढ सुरू आहे.

श्रेयसवर नजरा

श्रेयस अय्यरकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा असून आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांना ‘प्ले ऑफ’मध्ये घेऊन जाणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. त्याचा फॉर्म संघासाठी फायदेशीर ठरत आहे. त्याची ही कामगिरी उर्वरित सामन्यांमध्येही कायम राहो अशी अपेक्षा असेल. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत त्याने १२ सामन्यांमध्ये ४३५ धावा जमवल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

  • पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

  • दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.

१७-१६

आयपीएलमध्ये पंजाब आणि दिल्ली हे संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात १७ वेळा पंजाबने विजय मिळवला आहे, तर १६ वेळा दिल्लीने बाजी मारली आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

  • वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in