
बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी सायंकाळी होणाऱ्या धमाकेदार लढतीत चाहत्यांना महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी बाद फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी आतुर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी सामना होईल. त्यामुळे या दाक्षिणात्य द्वंद्वात कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करताना १० सामन्यांत ७ विजय मिळवले आहेत. त्यामुळे १४ गुणांसह बंगळुरू अव्वल चार संघांत स्थान टिकवून आहे. मात्र या सात विजयांपैकी फक्त एकच विजय बंगळुरूने घरच्या मैदानात म्हणजेच चिन्नास्वामीत मिळवलेला आहे. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध चिन्नास्वामीत विजय मिळवून बंगळुरूला बाद फेरीच्या दिशेने आणखी भक्कम पाऊल टाकता येईल. तसेच गतवर्षी अखेरच्या साखळी सामन्यात बंगळुरूने चेन्नईलाच नमवून बाद फेरी गाठली होती. त्या पराभवानंतर चेन्नईचीही कामगिरी ढासळली आहे.
धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ १० सामन्यांतील अवघ्या २ विजयांच्या ४ गुणांसह गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी ते बंगळुरूचे गणित बिघडवू शकतात. तसेच धोनीची ही चिन्नास्वामी स्टेडियमवरील अखेरची लढत ठरू शकते. त्यामुळे ४३ वर्षीय धोनी आणि विराट यांना एकत्रितपणे खेळताना पाहण्यासाठी चाहते गर्दी करतील, यात शंका नाही. पुढील हंगामाच्या दृष्टीने युवा खेळाडूंची चाचपणी करणे, हे चेन्नईचे लक्ष्य असेल.
दरम्यान, चिन्नास्वामीवर यंदाच्या हंगामातील ४ सामन्यांपैकी ३ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच बंगळुरूने येथे एकमेव विजय प्रथम फलंदाजी करताना मिळवला आहे. दवही येथे मोठ्या प्रमाणात येत असल्याने गोलंदाजांना संघर्ष करावा लागू शकतो.
बंगळुरूचे गोलंदाज उत्तम लयीत
दरवर्षी बंगळुरूला गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता असायची. मात्र यंदा बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार व यश दयाल यांचे वेगवान त्रिकुट, तर कृणाल पंड्या व सूयश शर्मा यांच्या फिरकी जोडीच्या बळावर बंगळुरूने अनेक सामन्यांत बाजी मारली. फलंदाजीत फिल सॉल्ट परतणे अपेक्षित आहे. तसेच विराट व देवदत्तही सातत्याने योगदान देत आहेत. दिल्लीविरुद्ध झालेल्या गेल्या लढतीत कृणालने फलंदाजीच्या बळावर संघाला तारले. रजत व जितेश शर्मा यांच्याकडून बंगळुरूला कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. टिम डेव्हिड अखेरीस उपयुक्त फटकेबाजी करत आहे. त्यामुळे यंदा बंगळुरूला २०१६नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची आणि आयपीएलच्या पहिल्या जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची उत्तम संधी आहे, असेच सर्वांचे मत आहे.
युवा फलंदाजांवर चेन्नईची भिस्त
चेन्नईच्या संघातील अनुभवी फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांना आता युवा खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. त्यातही मुंबईकर आयुष म्हात्रे, युवा डेवाल्ड ब्रेविस व शेख रशीद यांच्यावर लक्ष असेल. रवींद्र जडेजा व शिवम दुबे यांच्या फलंदाजी क्रमाविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे. गेल्या लढतीत तिसऱ्या स्थानी येत सॅम करनने मात्र दमदार अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत खलिल अहमद व फिरकीपटू नूर अहमद वगळता कोणीही फारशी छाप पाडू शकलेले नाहीत. विशेषत: मथीशा पाथिरानाला सर्व प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाज चोप देत आहेत. रविचंद्रन अश्विन व अंशुल कंबोजपैकी एकाला संधी मिळेल. जडेजाही गोलंदाजीत तितका प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळे बंगळुरूला रोखण्यासाठी चेन्नईला एकंदर सर्वच आघाड्यांवर कामगिरीत सुधारणा करावी लागेल. इतिहासात प्रथमच चेन्नईला सलग दोन हंगामांत बाद फेरी गाठता आलेली नाही, हे विशेष.
‘त्या’ पाच जणांमुळे मुंबईला रोखणे कठीण
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने गुरुवारी सलग सहावा विजय नोंदवला. ११ सामन्यांतील ७ विजयांसह मुंबईचा संघ तूर्तास गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर मुंबईचीच चर्चा आहे. त्यातही मुंबईच्या विजयात सातत्याने योगदान देणाऱ्या पंचकाविषयी सगळेच चर्चा करत आहेत. सलामीवीर रोहित शर्मा, सातत्याने छाप पाडणारा सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व त्याचा साथीदार ट्रेंट बोल्ट या पाच जणांमुळे मुंबईला रोखणे अन्य संघांना कठीण जात आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांंपैकी चेन्नईने २१, तर बंगळुरूने १२ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारी चेन्नईच्या बाजूने असली तरी सध्याच्या कामगिरीनुसार बंगळुरूचे पारडे जड आहे. त्यामुळे चाहत्यांना शनिवारी दोन्ही संघांत थरारक लढत अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप