
नवी दिल्ली : आगामी आयपीएलमध्ये तिकिटांचे दर आणखी महागणार आहेत. जीएसटीच्या दरवाढीचा फटका चाहत्यांना बसला असून त्यामुळे तिकिटांचे दर वाढणार आहेत. २८ ते ४० टक्के दर वाढण्याची शक्यता आहे.
आयपीएलचा १९वा हंगाम पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये रंगेल. यासाठी साधारणपणे १ हजार रुपयांपासून तिकिटांची सुरुवात होते. मात्र नव्या दरानुसार १,४०० रुपयांना तिकिटे विकली जातील, असे समजते.
दरम्यान, महिलांच्या विश्वचषकासाठी तिकिटांचे दर १०० रुपयांपासून सुरू होतील. बीसीसीआयने याविषयी गुरुवारी घोषणा केली. तसेच पुरुषांच्या आशिया चषकासाठी तिकीटविक्री देखील सुरू झाली आहे. ३० सप्टेंबरपासून भारतात महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. तर यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाचे संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषकही टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. आशिया चषक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान अ-गटात असून या गटात यूएई व ओमानचाही समावेश आहे. ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. आशिया चषकात भारताची सलामीची लढत दुबई येथे यूएईशी ९ तारखेला होईल. त्यानंतर १४ सप्टेंबरला भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ओमानविरुद्ध १९ तारखेला होणारा सामना मात्र अबुधाबी येथे होईल.