
हैदराबाद : घरच्या मैदानातील निराशाजनक कामगिरी विसरून अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयी पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. सोमवारी त्यांचा संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.
अलीकडेच झालेल्या सामन्यात दिल्लीचा संघ कोलकाता नाइट रायडर्सशी १४ धावांनी पराभूत झाला होता. मात्र ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेशाच्या त्यांच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या हैदराबादच्या संघाला पराभूत करण्यासाठी ते मैदानात उतरणार आहेत.
अष्टपैलू अक्षर पटेल कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे का? ते लवकरच कळेल.
क्षेत्ररक्षणा दरम्यान अक्षर दुखापतग्रस्त झाला असला तरी त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी केली. त्याने २३ चेंडूंत ४३ धावा फटकवल्या. जर का पूर्णपणे तंदुरुस्त न होताच खेळायला आला तर गोलंदाजीतील त्याच्या विविधतेमध्ये मर्यादा येऊ शकतात.
शनिवारच्या सामन्यापर्यंत दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी होता. १० सामन्यांत त्यांच्या खात्यात १२ गुण आहेत. मात्र घरच्या मैदानातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. हा पराभव विसरून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न संघाचा असेल.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, रविचंद्रन स्मरण.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप