श्रेयस-पाँटिंगमुळे पंजाबचे नशीब पालटले! तब्बल ११ वर्षांनी अग्रस्थानासह बाद फेरी गाठण्यात यश; माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम आता बाद फेरीच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. या हंगामात अग्रस्थान पटकावण्यासह क्वालिफायर-१मधील स्थान सर्वप्रथम पक्के करण्याचा मान मिळवला तो पंजाब किंग्जने. मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या जोडीने पंजाबचे नशीब पालटले, अशीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
श्रेयस-पाँटिंगमुळे पंजाबचे नशीब पालटले! तब्बल ११ वर्षांनी अग्रस्थानासह बाद फेरी गाठण्यात यश; माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक
Published on

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम आता बाद फेरीच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. या हंगामात अग्रस्थान पटकावण्यासह क्वालिफायर-१मधील स्थान सर्वप्रथम पक्के करण्याचा मान मिळवला तो पंजाब किंग्जने. मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या जोडीने पंजाबचे नशीब पालटले, अशीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे जगभरातील चाहते आणि माजी क्रिकेटपटूंकडून श्रेयस व पाँटिंग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. विशेषत: श्रेयसच्या नेतृत्वशैलीवर अनेकांनी स्तुतिसुमने उधळली आहेत.

३० वर्षीय श्रेयस देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये (रणजी, विजय हजारे) मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मात्र आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व करून श्रेयसने पुन्हा एकदा वाहवा मिळवली आहे. सोमवारी पंजाबने निर्णायक साखळी लढतीत पाच वेळच्या विजेत्या मुंबईला सात गडी राखून सहज धूळ चारली. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अग्रस्थान पक्के केले. त्यामुळे आता ते क्वालिफायर-१ लढत खेळतील. त्यामुळे पंजाबला २०१४नंतर पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. तसेच त्यांना पहिलेवहिले आयपीएल जेतेपदही खुणावत आहे.

“संघातील प्रत्येक खेळाडूने कोणत्या ना कोणत्या क्षणी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे हे श्रेय सर्व संघाचे आहे. पहिल्या सामन्यापासून आम्ही फक्त आक्रमकतेला सकारात्मकतेची साथ देत खेळ करत आहोत. पाँटिंगने मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संघात अनेक अनकॅप्ड खेळाडू आहेत. मात्र त्यांनी जबाबदारीने खेळ केला. त्यामुळे कर्णधार म्हणून माझे कार्य सापे झाले,” असे श्रेयस म्हणाला.

२०१४मध्ये पंजाबने जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर १० हंगामांत पंजाबला बाद फेरीसुद्धा गाठता आली नाही. श्रेयसने २०२४मध्ये कोलकाताचे यशस्वी नेतृत्व करताना त्यांना जेतेपद मिळवून दिले होते. मात्र त्यावेळी श्रेयसला विजयाचे श्रेय देण्यात आले नाही. तसेच त्याचे संघ व्यवस्थापनाशी पटत नसल्याचे समोर आले. अखेरीस पंजाबने लिलावात श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांत खरेदी केले. श्रेयसने फलंदाज म्हणूनही स्वत:ला सिद्ध करताना १४ सामन्यांत ५ अर्धशतकांसह ५१४ धावा केल्या आहेत. त्याशिवाय पंजाबला पहिल्या जेतेपदाचे स्वप्न दाखवताना त्याने आतापर्यंत उल्लेखनीय नेतृत्व केले आहे. त्यामुळे आता सलग दुसऱ्या वर्षी (कोलकातानंतर पंजाबसाठी) श्रेयस आयपीएलचा चषक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

श्रेयस कर्णधार झाला नाही, तर...

श्रेयसकडे नेतृत्वगुण ठासून भरलेले आहेत. कसोटी प्रकारातही तो स्वत:ला सिद्ध करू शकतो. मात्र टी-२० व एकदिवसीय प्रकारात श्रेयस नक्कीच भारताचा कर्णधार होण्याचा हकदार आहे. भविष्यात तसे झाले नाही, तर कदाचित ते भारताचे दुर्दैव असेल, असे स्पष्ट मत पाँटिंगने नोंदवले. पाँटिंग व श्रेयस यांनी दिल्ली कॅपिटल्स संघासाठीही एकत्रित कार्य केले आहे. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने २०२०मध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यंदा श्रेयस-पाँटिंगची जोडी पंजाबसाठी लकी ठरू शकते.

दरम्यान, पंजाबचा संघ फक्त क्वालिफायर-१मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे खेळाडू तसेच चाहत्यांनी हुरळून जाऊ नये. आमचे मुख्य लक्ष्य अद्याप साध्य झालेले नाही. त्यामुळे विजेतेपद मिळवल्यानंतरच खरा जल्लोष करू, असेही पाँटिंगने नमूद केले. पाँटिंग गतवर्षी दिल्लीचा प्रशिक्षक होता. मात्र त्याची हकालपट्टी करण्यात आली. मग प्रीती झिंटाच्या मालकी हक्क असलेल्या पंजाबने पाँटिंगला प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव देत नव्याने संघबांधणी करू दिली. लिलावापूर्वी पंजाबने फक्त दोनच खेळाडू संघात कायम राखले होते.

शशांकचे भाकीत खरे ठरले!

पंजाबचा फलंदाज शशांक सिंगने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एका पॉडकास्ट शोमध्ये मुलाखत दिली होती. त्यावेळी पंजाब यंदा आयपीएलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर असेल, असे भाकीत शशांकने वर्तवले होते. पंजाबची तयारी त्यादृष्टीने सुरू झाल्याचेही तो म्हणाला होता. पंजाबच्या सर्व खेळाडूंनी शशांकचे भाकीत खरे ठरवले. पंजाबने प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, नेहल वधेरा, शशांक, हरप्रीत ब्रार व विजय वैशाख अशा सहा अनकॅप्ड खेळाडूंसह (आंतरराष्ट्रीय अनुभव नसलेल्या) खेळून नवा विक्रम रचला.

श्रेयस कसोटी संघात का नाही?

श्रेयसने यंदा रणजी हंगामातही स्वत:ला सिद्ध केले. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने मुंबईचे यशस्वी नेतृत्व केले. रोहित आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर श्रेयसला कसोटी संघात स्थान मिळणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने श्रेयस नक्कीच दुखावला असेल, असे मत माजी क्रिकेटपटू अतुल वासन, आकाश चोप्रा यांनी नोंदवले. तसेच वासिम जाफरनेही श्रेयसची पाठराखण केली.

भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. करुण नायरचे संघात पुनरागमन झाले, तर साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन यांनाही संधी लाभली. मात्र श्रेयस संघाचा भाग नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“श्रेयस काही काळापासून कसोटी संघातून बाहेर आहे. मात्र निवड समिती अध्यक्षांनी त्याला लाल चेंडूसमोर कामगिरी उंचावण्याचे आदेश दिले आहेत. श्रेयसने रणजी हंगामात सुरेख कामगिरी करताना ६८.५७च्या सरासरीने ४८० धावा केल्या. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताला विजेतेपद मिळवून देण्यात त्याची मोलाची भूमिका होती,” असे आरपी सिंगने म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in