इराणी चषकासाठी आजपासून द्वंद्व! मुंबईसमोर शेष भारताचे कडवे आव्हान

रणजी विजेता संघ आणि उर्वरित राज्यांतील खेळाडूंच्या समावेशाद्वारे तयार झालेल्या संघात एकमेव अंतिम लढत इराणी चषकासाठी खेळवण्यात येते.
इराणी चषकासाठी आजपासून द्वंद्व! मुंबईसमोर शेष भारताचे कडवे आव्हान
Published on

लखनऊ : दुलीप ट्रॉफीनंतर आता मंगळवार, १ ऑक्टोबरपासून इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या ६१व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. रणजी विजेता संघ आणि उर्वरित राज्यांतील खेळाडूंच्या समावेशाद्वारे तयार झालेल्या संघात एकमेव अंतिम लढत इराणी चषकासाठी खेळवण्यात येते. यंदा या दोन्ही संघांचे नेतृत्व मराठमोळे खेळाडू करणार आहेत. अनुभवी अजिंक्य रहाणे र‌णजी विजेत्या मुंबई संघाचे, तर महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

यंदा १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर ही लढत खेळवण्यात येईल. रणजी चषकाप्रमाणेच ही लढतही लाल चेंडूने पाच दिवसांसाठी होईल. २०२३मध्ये झालेल्या इराणी चषकात शेष भारताने सौराष्ट्रला नमवून विजेतेपद पटकावले होते. या संघात यष्टिरक्षक ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज यश दयाल यांना स्थान देण्यात आले आहे.

दुसरीकडे मार्चमध्ये अजिंक्यच्याच नेतृत्वाखाली मुंबईने ४२व्यांदा रणजी चषक उंचावला. अंतिम फेरीत त्यांनी विदर्भावर मात केली. या संघात सर्फराझ खान परतल्याने मुंबईचे पारडे जड आहे. सर्फराझ, जुरेल व यश यांना भारतीय संघातून सूट देत या सामन्यात खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, सिद्धेश लाड असे खेळाडू मुंबईकडे आहेत. तसेच दुलीप ट्रॉफीत छाप पाडणारा इशान किशन, देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे या लढतीची उत्सुकता लागून आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद खान, रॉयस्टन डायस, आयुष म्हात्रे. (सर्फराझ खान आणि शिवम दुबे यांच्याविषयी साशंकता)

शेष भारत : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलिल अहमद, राहुल चहर.

logo
marathi.freepressjournal.in