इराणी चषकासाठी मराठमोळ्या कर्णधारांमध्ये झुंज; रहाणेकडे मुंबईचे, ऋतुराजकडे शेष भारताचे नेतृत्व; दोन्ही संघ जाहीर

१ ते ५ ऑक्टोबरदरम्यान लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर ही लढत खेळवण्यात येईल.
इराणी चषकासाठी मराठमोळ्या कर्णधारांमध्ये झुंज; रहाणेकडे मुंबईचे, ऋतुराजकडे शेष भारताचे नेतृत्व; दोन्ही संघ जाहीर
Published on

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीनंतर आता ऑक्टोबरमध्ये इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या ६१व्या हंगामाचा थरार रंगणार आहे. रणजी विजेता संघ आणि उर्वरित राज्यांतील खेळाडूंच्या समावेशाद्वारे तयार झालेल्या संघात एकमेव अंतिम लढत इराणी चषकासाठी खेळवण्यात येते. यंदा या दोन्ही संघांचे नेतृत्व मराठमोळे खेळाडू करणार आहेत. अनुभवी अजिंक्य रहाणे र‌णजी विजेत्या मुंबई संघाचे, तर महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड शेष भारत (रेस्ट ऑफ इंडिया) संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

यंदा १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर ही लढत खेळवण्यात येईल. रणजी चषकाप्रमाणेच ही लढतही लाल चेंडूने पाच दिवसांसाठी होईल. २०२३मध्ये झालेल्या इराणी चषकात शेष भारताने सौराष्ट्रला नमवून विजेतेपद पटकावले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) यांनी मंगळवारी अनुक्रमे शेष भारत आणि मुंबईचे संघ जाहीर केले.

मार्चमध्ये अजिंक्यच्याच नेतृत्वाखाली मुंबईने ४२व्यांदा रणजी चषक उंचावला. अंतिम फेरीत त्यांनी विदर्भावर मात केली. या संघात सर्फराझ खान, शिवम दुबे व सूर्यकुमार यादव यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सूर्यकुमार व शिवम बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताकडून खेळणे अपेक्षित आहे. भारत-बांगलादेश टी-२० मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असली तरी सर्व खेळाडूंना ३ तारखेपर्यंत ग्वालियरला पोहोचणे अनिवार्य आहे. तसेच सर्फराझचा २७ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध रंगणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश आहे. मात्र सर्फराझला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले नाही, तर तो त्वरित लखनऊसाठी रवाना होऊ शकतो.

त्याचप्रमाणे शेष भारत संघात यष्टिरक्षक ध्रुव जुरेल, वेगवान गोलंदाज यश दयाल यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र तेसुद्धा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा भाग आहेत. जर त्यांना दुसऱ्या कसोटीत अंतिम ११ खेळाडूंत संधी लाभली नाही, तर जुरेल व दयाल इराणी चषकात शेष भारताकडून खेळू शकतील. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी विजय मिळवला. आता २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे दुसरी कसोटी सुरू होईल. मग उभय संघांत ३ टी-२० सामने होतील.

दरम्यान, शार्दूल ठाकूर या लढतीद्वारे मुंबईच्या संघात पुनरागमन करेल. आयपीनंतर दुखापतीमुळे शार्दूल एकही लढत खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवड होण्याची शक्यता कमी असल्याने श्रेयसही मुंबईसाठी उपलब्ध असेल. तसेच दुलीप ट्रॉफीत छाप पाडणारा इशान किशन, देवदत्त पडिक्कल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

इराणी चषकाचे संघ

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद खान, रॉयस्टन डायस, आयुष म्हात्रे. (सर्फराझ खान आणि शिवम दुबे यांच्याविषयी साशंकता)

शेष भारत : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलिल अहमद, राहुल चहर.

logo
marathi.freepressjournal.in