

नवी दिल्ली : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ यंदादेखील जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे, असे मत माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने व्यक्त केले. आयपीएलच्या १९व्या पर्वात पंजाबचा संघ ३१ मार्च रोजी गुजरातविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात पंजाबने आजवर एकदाही जेतेपद मिळवलेले नाही.
श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबला गतवर्षी जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. अंतिम फेरीत बंगळुरूने पंजाबवर मात केली. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनी अंतिम फेरीत पोहोचूनही पंजाबच्या पदरी निराशा पडली. यापूर्वी २०१४मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र श्रेयसच्या नेतृत्वाची सगळीकडे चर्चा झाली. कारण २०२४मध्ये श्रेयसने कोलकाताचे नेतृत्व करताना त्यांना जेतेपद मिळवून दिले. तो संघ सोडल्यावर श्रेयसने पंजाबलाही अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आयपीएलमधील समालोचक पठाणने यंदा पंजाबलाच पहिला क्रमांक दिला आहे.
“आयपीएलमध्ये कागदावर सर्वच संघ बलवान असतात. मात्र मैदानातील कामगिरी निर्णायक ठरले. गतवर्षी मला श्रेयसच्या नेतृत्वाने प्रभावित केले. लिलावातही पंजाबने उत्तम संघबांधणी केली. त्यामुळे यंदा पंजाब जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल. ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस या खेळाडूंना सोडण्याचे धाडसी निर्णय त्यांच्यासाठी लाभदायी ठरणार का, हे पहावे लागेल,” असे पठाण म्हणाला.
“पंजाबच्या संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेल्या खेळाडूंना योग्य संधी मिळत आहे. प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरप्रीत ब्रार ही यांपैकीच काही नावे. त्यांच्या सोबतीला श्रेयस, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, युझवेंद्र चहल यांचा अनुभव आहेच. यंदा हा संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवून आयपीएलचा झळाळता चषक पहिल्यांदाच उंचावण्यासाठी आतुर असेल,” असेही पठाणने सांगितले.
करनच्या जागी शनका राजस्थान संघात
डावखुरा अष्टपैलू सॅम करन दुखापतीमुळे आगामी आयपीएलला मुकणार आहे. त्याच्या जागी श्रीलंकेचा प्रतिभावान अष्टपैलू दसुन शनकाची राजस्थान रॉयल्स संघाने निवड केली आहे. त्यामुळे शनकाने पाकिस्तान सुपर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असून याबाबतीत त्याने लाहोर कलंदर्स संघाला कळवले आहे. लिलावात बोली न लागलेले खेळाडू आता पीएसएलऐवजी आयपीएलला प्राधान्य देत असल्याचे याद्वारे स्पष्ट होते. यापूर्वी कोलकाताने झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानीला संघात सामील केले. तोसुद्धा पीएसएलमध्ये खेळणार होता.